नवी दिल्ली - संसदेच्या अधिवेशनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शेतकरी, पेपर लीक, देशातील दहशतीचं सावट, बजेट आणि टॅक्सबाबत विविध मुद्द्यांवर मोदी सरकारला घेरलं. देशात दहशतीचं सावट आहे. भाजपामध्येही लोक घाबरलेले आहेत. मंत्री घाबरलेत, देशातील शेतकरी भीतीच्या सावटाखाली आहे असं सांगत राहुल गांधी यांनी महाभारतातील चक्रव्यूहाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
२१ व्या शतकात नवं चक्रव्यूह
२१ व्या शतकात नवं चक्रव्यूह असून तेही कमळाच्या आकाराचे आहे. ज्या चक्रव्यूहात अभिमन्यूला अडकवलं होतं. तिथे आता हिंदुस्तानातील जनता आहे. देशातील युवा, शेतकरी, माता-भगिनी, लघु-मध्यम उद्योजक अडकले आहेत. या चक्रव्यूहचं चिन्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या छातीवर लावून फिरतात. महाभारतातील चक्रव्यूहात ६ जण होते, द्रोणाचार्य, कर्ण, कृपाचार्य, क्रूतवर्मा, अश्वधामा आणि शकुनी नियंत्रित करत होते. आजही ६ लोक आहेत ज्यात नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, अजित डोवाल आणि अंबानी-अदानी आहेत असा आरोप राहुल गांधींनी केला.
टॅक्स टेररिज्म रोखण्यासाठी...
बजेटवरील भाषणात राहुल गांधी यांनी निर्मला सीतारामन यांच्यावर प्रश्न विचारत त्यांच्या बजेटमध्ये पेपर लीकवर एकही शब्द नव्हता. शिक्षण क्षेत्रासाठी यावेळच्या बजेटमध्ये सर्वाधिक कमी निधी देण्यात आला. २० वर्षात पहिल्यांदा इतका कमी निधी शिक्षण खात्याला दिला. टॅक्स टेररिज्म रोखण्यासाठी बजेटमध्ये सरकारने काहीच केले नाही. मध्यमवर्गीयांच्या पाठीत आणि छातीत खंजीर खुपसण्याचं काम सरकारने केले. याच मध्यमवर्गीयांनी पंतप्रधान मोदींच्या सांगण्यावरून कोविड काळात थाळ्या वाजवल्या, मोबाईल फ्लॅश लाईट लावली. आता हे मध्यमवर्गीय काँग्रेसकडे येतायेत. आम्ही तुमचा चक्रव्यूह तोडणार असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.
अग्निवीरांसाठी एक रुपयाही नाही
बजेटमध्ये सरकारने अग्निवीर योजनेसाठी एक रुपयाही दिला नाही. त्यांच्या पेन्शनसाठी पैसे नाहीत. अग्निवीर चक्रव्यूहात अडकला आहे. बजेटमध्ये इंटर्नशिप प्रोग्रॅम खेळ बनला आहे. युवकांना रोजगार नाही. रोजगार देणाऱ्यांवर चक्रव्यूह हल्ला करते असा आरोप राहुल गांधींनी केला.
अंबानी-अदानींचं नाव घेतल्यानं गोंधळ
राहुल गांधी सातत्याने त्यांच्या भाषणात अंबानी अदानी यांचं नाव घेत हे दोघं देशातील उद्योगाला नियंत्रित करतात असा आरोप केला. अंबानी अदानी यांचं नाव सभागृहात घेतल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना रोखलं. त्यावर मी त्यांना A1, A2 बोलू शकतो का? असा प्रतिसवाल राहुल गांधींनी केला त्यानंतर सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात गोंधळ उडाला.