बंगळुरू : कर्नाटकचे लघुउद्योगमंत्री रमेश एल. जारकीहोली आणि प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मी आर. हेब्बाळकर यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या धाडीत सुनियोजित आणि संघटित करचोरीचे पुरावे हाती लागले, अशी माहिती आयकर विभागाने दिली. आयकर विभागाने या नेत्यांची घरे आणि प्रतिष्ठानांवर १९ जानेवारी रोजी धाडी टाकल्या होत्या. या धाडीत १६२ कोटी रुपयांहून अधिकची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली होती. शिवाय ४१ लाख रुपयांची रोकड तसेच १२.८ किलो सोने आणि इतर दागीने जप्त करण्यात आले होते. जारकीहोली आणि हेब्बाळकर यांच्या गोकाक आणि बेळगाव येथे बेनामी मालमत्ता असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे धाडी टाकण्यात आल्या. यात बेनामी मालमत्ता तसेच छुप्या गुंतवणुकीची माहिती समोर आली. दोन्ही ठिकाणी सुनियोजित पद्धतीने करचोरी करून काळा पैसा तयार करण्यात आल्याचे आढळले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आयकर कारवाईबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना जारकीहोली यांनी हे राजकीय षड्यंत्र असल्याचे म्हटले. मी काहीही अयोग्य केलेले नाही. हा माझ्याविरुद्धचा राजकीय कट आहे. आयकर विभागाचे अधिकारी बेळगाव येथे आमच्याकडे आले होते. आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य केले, असे त्यांनी सांगितले.
काँग्रेस नेत्यांकडून करचोरी
By admin | Published: January 25, 2017 12:58 AM