नवी दिल्ली : दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या रोख दागिने खरेदीवर आता एक टक्का टीसीएस (टॅक्स कलेक्टेड अॅट सोर्स) द्यावा लागणार आहे. एक एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार आहे. सद्या या कराची मर्यादा पाच लाख रुपये आहे. आर्थिक विधेयक २०१७ मंजूर झाल्यानंतर दागिनेही सामान्य वस्तूंच्या यादीत येणार आहेत. त्यामुळे यावर एक टक्का कर द्यावा लागणार आहे. या विधेयकात टीसीएससाठी पाच लाख रुपयांच्या दागिन्यांच्या खरेदीची मर्यादा समाप्त करण्याचा प्रस्ताव आहे. कारण, २०१७ -१८ च्या अर्थसंकल्पात तीन लाख रुपयांपेक्षा अधिक रक मेच्या नगदी व्यवहारांवर प्रतिबंध आणले आहेत. याचे उल्लंघन करणाऱ्या व नगदी रक्कम स्वीकारणाऱ्या व्यक्तीला तितक्याच रकमेचा दंड देण्याची तरतूद आहे. दागिन्यांना आता सामान्य वस्तूंच्या श्रेणीत टाकण्यात आले आहे.सामान्य वस्तूंच्या श्रेणीत आता दागिन्यांना टाकल्याने एका वेळी दोन लाख रुपयांपेक्षा अधिकच्या दागिने खरेदीवर आता एक टक्का टीसीएस आकारण्यात येणार आहे. मोठ्या व्यवहारातून काळ्या पैशांची देवाणघेवाण रोखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दरम्यान, आयकर विभाग १ जुलै २०१२ पासूनच दागिन्यांच्या दोन लाख रुपयांपेक्षा अधिक खरेदीवर एक टक्का टीसीएस आकारत आहे.
दोन लाखांपुढील रोख दागिने खरेदीवर कर
By admin | Published: February 20, 2017 4:34 AM