ऑनलाइन लोकमत
मनाली, दि. 23 - देशातील सर्वांत लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक म्हणजे मनाली. गेल्या काही वर्षांत मनाली येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत फार मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे येथील टॅक्सी चालकांचा व्यवसायसुद्धा वाढत आहे. तसेच, काही टॅक्सी चालकांचा मनमानी कारभार होताना दिसून येत आहे. येथील मारही ते मनाली अवघ्या 34 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी लागणारे टॅक्सीचे भाडे ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. मारही स्नो पाईंटचे स्थळ असून याठिकाणी मनालीपासून जाण्यासाठी व येण्यासाठी 70 किलोमीटरचे अंतर आहे. या प्रवासासाठी टॅक्सी चालक 15,000 रुपयांचे भाडे आकारत आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये हाच प्रवास करण्यासाठी टॅक्सी चालक तीन हजार ते पाच हजार रुपये इतके भाडे आकारत होते. मात्र, सध्या यामध्ये वाढ केली असून येथील बर्फाच्छादित प्रदेश दाखविण्याच्या नावाखाली टॅक्सी चालकांनी 15, 000 रुपये घेत असल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे.
काही प्रवासी वाहने प्रत्येक प्रवाशांकडून मारही ते मनालीसाठी 15,000 रुपये घेत आहेत. तर, 11 ते 14 सीटची क्षमता असलेले टेम्पो ट्रॅव्हलर्स प्रत्येकी प्रवाशांकडून एक हजार ते दीड हजार रुपयापर्यंतचे भाडे आकारत आहेत. काही पर्यटक अव्वाच्या सव्वा भाडे पाहून वाद घालत आहेत, तर काही विना तक्रार आनंदाने भाड्याची रक्कम देत आहेत.
याचबरोबर, मनाली हे शहर पर्यटनासाठी देशातील पर्यटकांना आकर्षित करत आहेत. त्यामुळे दरवर्षी महाराष्ट्र, गुजरातसह दक्षिण भारतातील पर्यटक हजारोंच्या संख्येने याठिकाणी दाखल होतात. या पर्यटकांमुळे येथे हॉटेलिंग व्यवसायसुद्धा वाढत आहे. आता तर त्यांच्यात एक प्रकारची स्पर्धाच लागलेली आहे. त्यामुळे हॉटेल्सच्या संख्येत वाढही झाली आहे.