ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि.३१ - औषधे आणण्यासाठी म्हणून घराबाहेर पडलेल्या २४ वर्षीय एअर होस्टेसवर एका टॅक्सीचालकाने बलात्काराचा प्रयत्न केला. मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हैदराबादमध्ये ही घटना घडली. आरोपीने एअर होस्टेसचा विनयभंग करुन तिच्या जवळची रोख रक्कम लुटली. त्यानंतर पीडित तरुणीला निर्जनस्थळी सोडून तिथून पसार झाला.
पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून त्याचे नाव इमरान आहे. पोलिसांनी इमरानवर बलात्कार आणि दरोडयाचा गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी मध्यरात्री पीडित तरुणी औषधे आणण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली. जवळचे औषधाचे दुकान बंद असल्याने ती जवळ उभ्या असलेल्या टॅक्सीकडे गेली.
औषधाच्या दुकानात जाण्यासाठी म्हणून ती टॅक्सीत बसली. पण टॅक्सीचालक तिला आउटर रिंग रोडवर निर्जन स्थळी घेऊन गेला. तिथे त्याने तरुणीवर लैंगिक जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असे पीडित तरुणीने राजेंद्रनगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या पोलिस तक्रारीत म्हटले आहे.
पीडित तरुणी ड्रायव्हरच्या शेजारी बसली होती. त्याने हाताला पकडून जवळ खेचण्याचा प्रयत्न केला पण तरुणीने त्याला जोरदार प्रतिकार केला. त्या झटापटीत ड्रायव्हरने माझ्या हातातून मोबाईल खेचून घेतला व मला निर्जन स्थळी उतरवले पसार झाला असे तरुणीने सांगितले.