गरीब टेलरचा मुलगा बनला 'सीए टॉपर', आई-वडिलांना सुखी ठेवणं हेच लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 01:38 PM2019-01-24T13:38:29+5:302019-01-24T13:43:03+5:30
कोटा येथील एका कपडे शिवणाऱ्या टेलरच्या मुलाचे हे यश लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे.
जयपूर - राजस्थानच्या कोटा शहरातील एका टेलरच्या मुलाने पहिल्याच प्रयत्नात सीएचीपरीक्षा प्रथम क्रमांकाने पास केली. शादाब हुसेन असे या गरीब मुलाचे नाव असून तो यंदाच्या सीए परीक्षेत देशातील टॉपर बनला आहे. शादाबने 800 गुणांपैकी 597 गुण मिळवत ( जुना अभ्यासक्रम) देशात टॉपर राहण्याचा बहुमान मिळवला. शादाबच्या वडिलांनी घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याची भावना नातेवाईक व मित्रपरिवारांकडून व्यक्त होत आहे.
कोटा येथील एका कपडे शिवणाऱ्या टेलरच्या मुलाचे हे यश लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे. पहिल्याच प्रयत्नात शादाबने हे यश संपादन केल्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षावर होत आहे. इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रानुसार, शादाब एका सामान्य कुटुंबातील मुलगा असून त्याचे वडिल व्यवसायाने टेलर आहेत. त्यांचे शिक्षण केवळ दहावीपर्यंत झाले आहे. मात्र, तरीही आपल्या मुलाला त्यांनी सीएपर्यंत शिकवले. चार मुली आणि एक मुलगा असा परिवार असतानाही, शादाबच्या शिक्षणासाठी त्याच्या वडिलांनी कुठेही कसर ठेवली नाही. त्यामुळेच, कोटा युनिव्हर्सिटीतून बी कॉमची पदवी धारण केल्यानंतर शादाबने सीएची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. कारण, सीएच्या क्षेत्रात शेवटपर्यंत आपल्याला काहीतरी शिकता येते, असे शादाबचे म्हणणे आहे. मी नोकरी मिळविण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेऊन अभ्यास केला. मला माझ्या आई-वडिलांना सुखात ठेवायचंय हेच मला माहिती आहे. त्यासाठी, मी मेहनत घेतल्याचंही शादाबने म्हटले. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही शादाबच्या यशाबद्दल त्याचे आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन कौतुक केलंय. तुझ्या कर्तृत्वाचा मला अभिमान असून पुढील करिअरसाठी शुभेच्छा... असा संदेश राहुल गांधींनी शादाबसाठी लिहिला आहे.
अशी दिली परीक्षा
परीक्षा देताना सर्वप्रथम मी प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक वाचली. त्यानंतर, मला जे सहज वाटले ते 3 ते 4 प्रश्न सोडवले, ज्यामध्ये मला 40 गुण मिळतील. विशेष म्हणजे हे सर्व प्रश्न एका तासात सोडविण्याचा मी प्रयत्न केला. तर दोन तासांत जास्तीत जास्त मार्क मिळविण्यावर मी भर दिला. त्यामुळे माझे स्कोरींग वाढण्यास मदत झाल्याचे शादाबने सांगितले.