ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.13- रेल्वेप्रवाशाने केलेल्या एका ट्वीटमुळे एका भ्रष्ट टीसीला नोकरी गमवावी लागली आहे. बाडमेर-कालका एक्स्प्रेसमधून प्रवास करणा-या गोविंद नारायण यांनी केलेल्या ट्वीटमुळे ट्रॅव्हेलिंग टिकीट इन्स्पेक्टर श्यामलाल यांना नोकरी गमवावी लागली आहे.
कालका एक्सप्रेसमध्ये श्यामलाल हा टीसी 15 रुपये घेऊन प्रवाशआंना सीट देत होता. मात्र, त्यानंतर कोणती पावती तो प्रवाशआंना देत नव्हता. याच गाडीने प्रवास करणा-या गोविंद नारायण यांनीही 15 रूपये श्यामलाल यांना दिले व त्याबदल्यात पावतीची मागणी केली. त्यावर श्यामलाल यांनी पावतीबाबत गोविंदला उडवाउडवीची उत्तरं दिली. श्यामलालची बनवाबनवी लक्षात येताच गोविंद यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्यासह रेल्वेच्या इतर अधिकाऱ्यांना ट्वीट करून यासंबंधी तक्रार केली.
तक्रार केल्याच्या दोन तासांतच रेल्वेच्या अधिका-यांनी गोविंद यांच्याशी संपर्क साधला व संबंधीत डब्यामध्ये पोहोचले. त्यानंतर गोविंद नारायण यांच्यासह इतर प्रवाशांकडे त्यांनी चौकशी केली. सर्व प्रकार समजवून घेतल्यानंतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार श्यामलाल यांचं तातडीने निलंबन करण्यात आलं. शिवाय पुढील स्थानकावर त्यांना रेल्वेतून खाली उतरविण्यात आलं.