ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 20 - टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस(टीसीएस)च्या बोर्डानं 16 हजार कोटींचे शेअर परत खरेदी करण्यास परवानगी दिली आहे. भारतीय भांडवल बाजारातील हा सर्वात मोठा व्यवहार ठरणार आहे. त्यामुळे भागधारकांना पैशाच्या माध्यमातून परतावा मिळणार आहे. कंपनीनं 2850 रुपयांच्या किमतीवर 5.61 कोटींचे शेअर परत खरेदी करणार आहे. 20 फेब्रुवारीला झालेल्या बोर्डाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली आहे. टेंडरच्या माध्यमातून हा व्यवहार करण्यात येणार असून, त्यामुळे शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. शेअर बाजारात टीसीएसच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाली आहे. टीसीएसचे शेअर आज 4.03 टक्क्यांनी वाढून 2506.50 रुपयांवर बंद झाले आहेत. टीसीएसच्या 2.85 टक्के शेअरची किंमत प्रत्येकी 2,850 रुपये इतकी आहे. कंपनी शेअर बाजाराच्या माध्यमातून निविदा प्रक्रियेचा उपयोग करून हे शेअर परत खरेदी करणार आहे. या प्रमुख सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या टाटा समूहाकडे टीसीएसचे जवळपास 73.33 टक्के शेअर आहेत. शेअर परत खरेदी केल्यामुळे प्रमोटर्सची भागीदारी वाढणार आहे. टीसीएसमध्ये एन. चंद्रशेखरन यांचा आज सीईओ म्हणून शेवटचा दिवस आहे. त्यानंतर ते टाटा सन्सचं चेअरमनपद सांभाळतील.
टीसीएसची 16 हजार कोटींचे शेअर परत खरेदी करण्यास मंजुरी
By admin | Published: February 20, 2017 8:23 PM