TDP all set to return to NDA (Marathi News) नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानेआंध्र प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) सोबत युती निश्चित केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत युती करण्यासंदर्भात भाजपा आणि टीडीपीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरू होती. आता या चर्चेला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. यासोबतच अभिनेता पवन कल्याण यांच्या पक्षाचाही एनडीएमध्ये समावेश करण्यात आला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, जागावाटपाचा करार या तिन्ही पक्षांमध्ये झाला आहे.
चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष टीडीपी यापूर्वीच एनडीएचा भाग होता. टीडीपीनेही केंद्रातील एनडीएच्या भागीदार पक्षाची भूमिका बजावली होती. नंतरच्या काळात भाजपा आणि टीडीपीमध्ये दुरावा झाल्याचे पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा दोन्ही पक्षांनी आंध्र प्रदेशात एकत्र लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, पवन कल्याण यांच्या पक्षाशीही भाजपाने युती केली आहे. आंध्र प्रदेशात टीडीपीसोबतच पवन कल्याण यांच्या पक्ष जनसेनासोबत राष्ट्रीय पातळीवरही युती करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि टीडीपी यांच्या युतीचा फायदा दोन्ही पक्षांना होण्याची शक्यता आहे. भाजपा आणि टीडीपी यांच्यात युती झाल्यानंतर जागावाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित झाला आहे. युतीसाठी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार भाजपा आंध्र प्रदेशातील लोकसभेच्या एकूण सहा जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. त्याचबरोबर विधानसभेच्या २० जागांवर निवडणूक लढवली जाणार आहे. दुसरीकडे, चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष टीडीपी लोकसभेच्या १६ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे, तर ३ जागा जनसेनेच्या वाट्याला गेल्या आहेत.
बऱ्याच दिवसांपासून सुरु होती चर्चाभाजपाचे सर्वोच्च नेते आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्यात युतीबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. जागावाटपाबाबत समस्या होती, ती आता दूर झाली आहे. आतापर्यंतच्या फॉर्म्युल्यानुसार भाजपा, टीडीपी आणि जनसेना पक्षामध्ये सामंजस्य करार झाला आहे. दरम्यान, भाजपा दक्षिण भारतात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशात भाजपा आणि टीडीपीचे एकत्र येण्याचे पाऊल अतिशय महत्त्वाचे आहे.