देशभरात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA ला बहुमत मिळाले आहे. मात्र, यावेळी भाजपची इतर सहकारी पक्षांवरील निर्भरता वाढली आहे. कारण यावेळी भाजपला स्वबळावर बहुमतापासून (२७२) दूर राहावे लागले आहे. खरे तर भाजपला 2014 नंतर पहिल्यांदाच एकट्याच्या बळावर बहुमत मिळालेले नाही.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेण्यापूर्वीच राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चांना उधान आले आहे. चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टी (TDP) आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल यूनाइटेडने (JDU) काही महत्वाची मंत्रालये मागितल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यातच आता 'जेडीएस'नेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अशी आहे जेडीएसची भूमिका? -जेडीएस नेते तथा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी, "आम्ही नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत. माझ्या शिवाय संपूर्ण देशालाच पंतप्रधान मोदींकडून मोठ्या अपेक्षा आहेत," असे म्हटले आहे. एचडी कुमारस्वामी हे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीमध्ये पोहोचले आहेत. यावेळी, युतीत सहभागी असलेले विविध पक्ष, विविध प्रकारच्या मागण्या करत आहेत. यासंदर्भात आपले काय म्हणणे आहे? असा प्रश्न केला असता, कुमारस्वामी म्हणाले, "काहीही मागणी नाही, देशाला स्थिर सरकार हवे आहे."
खरे तर एनडीएकडे 293 खासदार आहेत. हा आकडा 543 सदस्यांच्या लोकसभेसाठी आवश्यक असलेल्या 272 पेक्षा अधिक आहे. एकट्या भाजपकडे 240 जागा आहेत. तसेच, एनडीएतील टीडीपीकडे 16, तर जेडीयूकडे 12 जागा आहेत. ज्या अत्यंत आवश्यक आहेत. याशिवाय, जेडीएसकडे 2 खासदार आहेत आणि काही इतर.
काय आहे टीडीपीची मागणी? -माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, टीडीपीने 6 मंत्रालये मागितली आहेत. ते 5 वरही राजी होण्यास तयार आहेत. याशिवाय, त्यांना लोकसभा अध्यपदही हवे आहे.
जेडीयूला काय हवं? - जेडीयूच्या एका नेत्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, पक्षाला तीन मंत्रालये हवी आहेत. याशिवाय, नितीश कुमार रेल्वे, ग्रामीण विकास आणि कृषी यासारख्या मोठ्या मंत्रालयांची मागणी करू शकतात, असेही पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.