Telugu Desam Party Related Stocks: लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांचा आनंद गगनात मावेना. त्यांच्या पक्षाने विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत बंपर विजय मिळवल्यामुळे ते किंगमेकरच्या भूमिकेत आले आहेत. तेलुगू देसम पक्षाने विधानसभेत 135 तर लोकसभा निवडणुकीत 16 जागा मिळवल्या आहेत. यामुळे त्यांना एनडीए सरकारमध्ये मंत्रिपद मिळणारच आहे, पण शेअर बाजारातूनदेखील त्यांना मोठा लाभ मिळाला आहे.
या शेअर्समध्ये 20 टक्क्यांपर्यंत वाढ चंद्राबाबू नायडू चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होणार असून, लोकसभा निवडणुकीतदेखील त्यांच्या पक्षाचा मोठा विजय झाला. त्यामुळेच त्यांच्या पक्षाशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. मिळलेल्या माहितीनुसार, तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) शी संबंधित कंपन्यांचे शेअर्स 5 जून रोजी 20 टक्क्यांनी वाढले.
हेरिटेज फूड्सच्या शेअर्समध्ये जोरदार वाढTDP शी संबंधित कंपनी हेरिटेज फूड्सच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या हा शेअर 546.50 रुपयांचा विक्रमी उच्चांकावर आहे. टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी हेरिटेज फूड्सची स्थापना केली होती. कंपनीअंतर्गत तीन व्यावसायिक विभाग - डेअरी, रिटेल आणि कृषीसेवा आहे. चंद्राबाबू यांचा मुलगा नारा लोकेश हेरिटेज फूड्सच्या प्रवर्तकांपैकी एक आहेत. हेरिटेज फूड्सचे शेअर्स गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये सुमारे 38 टक्क्यांनी वाढले आहेत.
अमरा राजा एनर्जीमध्ये बंपर वाढ आज नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर अमरा राजा एनर्जीचा शेअर 14 टक्क्यांनी वाढून 1233.95 रुपयांवर व्यवहार करत होता. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हे TDP संसदीय पक्षाचे माजी नेते गल्ला जयदेव आहेत. दोन वेळचे खासदार आणि अमरा राजा ग्रुपच्या प्रमुखांनी या वर्षी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यांच्या पक्षाच्या प्रचंड विजयामुळे कंपनीला मोठा नफा मिळत आहे.