नवी दिल्ली - आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना त्यांच्या स्वपक्षीय खासदारांनीच जबरदस्त धक्का दिला आहे. तेलुगू देसम पक्षाचे चार राज्यसभा खासदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. आपण तेलगू देसममधून राजीनामा देत असल्याचे पत्र त्यांनी असे पत्र त्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना दिले आहे. तेलगू देसम पक्षाचे राज्यसभा खासदार सी.एम. रमेश, टी.जी. व्यंकटेश, जी. मोहन राव आणि वाय. एस. चौधरी यांनी टीडीपीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करण्याची तयारी केली आहे. सध्या टीडीपीचे राज्यसभेत सहा खासदार असून, सहापैकी चार खासदार एकत्र भाजपात सामील होत असल्याने त्यांना पक्षांतरबंदीचा नियमही लागू होणार नाही. त्यामुळे ते राज्यसभेच्या सदस्यपदी कायम राहतील. दरम्यान, आम्ही आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी आणि राज्याच्या हिताच्या मुद्द्यावर आम्ही भाजपाशी लढा दिला. त्यासाठी आम्ही केंद्रातील मंत्रिपदांवरही पाणी सोडले. तेलगू देसमला दुर्बल बनवण्यासाठी भाजपाने केलेल्या प्रयत्नांचा मी निषेध करतो. असे धक्के पक्षासाठी नवे नाहीत. त्यामुळे नेते आणि कार्यकर्ते निराश होणार नाहीत, असे चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत तेलगू देसम पक्षाचा दारुण पराभव झाला होता. पक्षाला लोकसभेच्या 25 पैकी 3 जागांवरच विजय मिळाला होता. तर विधानसभेच्या 175 जागांपैकी केवळ 23 जागांवर टीडीपीला समाधान मानावे लागले होते.