-नितीन अग्रवालनवी दिल्ली : कोरोना महासाथीने ढासाळलेल्या अर्थव्यवस्थेचा परिणाम सरकारच्या कार्यप्रणालीवरही होऊ लागला आहे. आर्थिक सुधारणांसाठी उपाययोजना करणारे सरकार आता सरकारी खर्चात काटकसर करण्यासाठी विविध उपाययोजनांनुसार मंत्रालये आणि विभागांच्या खर्चाला कात्री लावत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्ग परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने संबंधित विभागांना अनावश्यक खर्चात कपात करण्याचा आदेश दिला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत विकास महामंडळ लिमिटेडसह दुसऱ्या विभागांना दिलेल्या परिपत्रकात कार्यालयीन खर्च, पुरवठा, रेशन यासारख्या १९ बाबींवरील खर्चात कपात करण्यास सांगण्यात आले आहे. यानंतर कार्यालयातील दैनंदिन खर्चासोबत चर्चा आणि बैठकांत चहा, नाश्ता यासह अन्य दुसऱ्या खर्चात कपात होईल. याव्यतिरिक्त देशी-विदेशी दौरे आणि विशेषत: हवाई प्रवास खर्चातही कपात करावी लागेल, तसेच अतिरिक्त काम, प्रोत्साहन योजनांतही काटकसर केली जाईल.
एका अधिकाऱ्यानुसार अशा प्रचार आणि प्रसाराच्या खर्चाला हमखास कात्री लावली जाईल. याशिवाय विभागाचा प्रशासकीय खर्चही मर्यादित केला जाईल. सहायक अनुदान, योगदान, प्रकाशन यावरील खर्चही कमी होईल. छोट्या- मोठ्या दुरुस्तीची कामे, सेवा, तंबू आदीच्या भाडेखर्चही मर्यादित करावा लागेल.
काटकसर करण्याचे निर्देश
वित्तमंत्रालयाने पूर्वी व्यय विभाग आणि सर्व केंद्रीय मंत्रालये आणि विभागांना वाजवी खर्च करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालये आणि विभागांना अनावश्यक खर्चात २० टक्के कपात करण्यास सांगण्यात आले आहे, तसेच विभागांना चहा- नाश्ता, हवाई प्रवास खर्चात कपात करण्यास सांगण्यात आले होते; परंतु कोरोनाशी संबंधित खर्चाला या काटकसरीच्या व्याप्तीबाहेर ठेवण्यात आले आहे.