ऑनलाइन लोकमत
वाराणसी, दि. १८ - गरीबी हटावचे नारे दिले गेले परंतु प्रत्यक्षात गरीबीचं निर्मूलन करण्यात आपण अपयशी ठरल्याचं सांगताना आता गरीबीविरुद्ध युद्ध पुकारण्याची गरज असून त्यासाठी मुलांचं शिक्षण अत्यंत महत्त्वाचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. कितीही वाईट परिस्थिती असो, कितीही संकटं आलेली असोत परंतु मुलांचं शिक्षण व्हायलाच हवं हा ध्यास घेतलात तर गरीबीपासून मुक्ती मिळेल असं सांगत एकवेळ माझ्याप्रती नाराजी व्यक्त करा परंतु मुलांना शिकवाच असं कळकळीचं आवाहन मोदींनी वाराणसी येथे केले.
रिक्षा संघाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या पंतप्रदानांच्या हस्ते १०१ ई-रिक्षा व ५०१ सायकल रिक्षांचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या ६०२ रिक्षा अशांना देण्यात आल्या ज्यांच्याकडे यापूर्वी स्वत;ची रिक्षा नव्हती. दुस-याची रिक्षा भाड्याने घेऊन ते रिक्षा चालवत आणि कमाईतला मोठा हिस्सा भाड्यापोटी जात असे. विविध बँकांच्या व अन्य संस्थांच्या सहाय्याने कमी व्याजदराचे कर्ज उपलब्ध करून देऊन या रिक्षाचालकांना रिक्षा देण्यात आल्या असून एखाद-दोन वर्षात ते या रिक्षांचे मालक बनतिल असे मोदी म्हणाले.
जे काम पन्नास वर्षात झाले नाही ते गरीबांंच्या बँक खात्यांचे काम मी वर्षभरात केले असे सांगताना आज १८ कोटी गरीबांनी जनधन योजनेत खाते उघडल्याचे मोदी म्हणाले. काही अपवाद वगळता बहुतेक सगळ्या भारतीयांकडे आता बँक खाते असल्याचे सांगणा-या नरेंद्र मोदींनी या गरीबांनी ३० हजार कोटी रुपये बँकांमध्ये ठेवल्याचेही सांगितले.
दारीद्र्य निर्मूलनाचे जे काम आपले विरोधक ५० वर्षात करू शकले नाहीत ते मी ५० महिन्यात करून दाखवेन असा दावाही यावेळी मोदींनी केला.