मुंबई - जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाने भारतातही थैमान घातल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळेच देशात लॉकडाऊनचा ४ था टप्पा सुरु झाला आहे. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये देशात कोरोनाचे १ लाखांपेक्षा अधिक रुग्ण झाले आहेत. तर, लॉकडाऊनमुळे अनेकांचे हाल होत आहेत. गरिब, मजूर आणि कामगार वर्गाला या लॉकडाऊनचा मोठा फटका बसला असून सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. चीनच्या वुहान शहरातून हा व्हायरल जगभर पसरला आहे. त्यामुळे, चीनविरुद्ध अनेक देशांनी राग आवळला आहे. भारतीय नागरिकांमध्येही चीनबद्दल तीव्र संताप दिसून येतो. त्यामुळेच, टीकटॉकवर बंदी घाला, अनइन्स्टॉल करा, असे आवाहन तरुणाई करताना दिसत आहे. आता केंद्रीयमंत्र्यांनी चिनी उत्पादनावर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे.
कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगभरातील 6 कोटी लोक गरिबीच्या कचाट्यात सापडणार आहेत, अशा इशारा जागतिक बँकेनं दिला आहे. संकटावर मात करण्यासाठी मोहिमेचा एक भाग म्हणून जागतिक बँकेनं 100 विकसनशील देशांना 160 अब्ज डॉलर्सची मदत देण्याची घोषणा केली आहे. ही सर्व रक्कम 15 महिन्यांच्या कालावधीत दिली जाणार आहे. कोरोनाचा फटका जगभरातील बहुतांश विकसित व विकसनशील देशांना बसला आहे. त्यामुळेच, चीनवर कारवाई करण्याची मागणी अमेरिकेनं केली होती. तर, भारतीय नागरिकांमध्येही चीनविरुद्ध संताप आहे. त्यामुळेच, भारतीय नागरिकही सोशल मीडियावरुन चीनी उत्पादनावर बहिष्कार घालण्याची मोहित राबवताना दिसत आहे. आता, खुद्द केंद्रीयमंत्र्यांनी चिनी मालावर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री डॉ. रामदास आठवले यांनी चिनी उत्पादनावर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं आहे. आठवले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर करत, चीनमुळेच कोरोना जगभरात पसरला असून आपल्या भारत देशालाही त्याचा फटका बसल्याचे सांगत, चीनी उत्पादनावर बहिष्कार घालण्याचं सूचवलं आहे. कोरोनामुळे जगभरात ३ लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १ लाखाच्या पुढे गेली आहे. तर, महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या ३५ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे, चीनविरुद्ध अनेकांच्या मनात राग आहे. चीनला धडा शिकविण्यासाठी, चिनी उत्पादनावर बहिष्कार घालावा, असं आवाहन डॉ. आठवले यांनी केलं आहे.