ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 15 - बुधवारी जम्मू काश्मीरमधील केरन सेक्टरमध्ये झालेल्या फायरिंगमध्ये दोन जवान शहीद झाले होते. यामध्ये लान्स नायक रणजीत सिंह यांचाही समावेश होते. शुक्रवारी त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं होतं. आपल्या वडिलांचं पार्थिवर पाहिल्यानंतर आठ वर्षाच्या चिमुरडीला अश्रू आनावर झाले होते. मात्र या परिस्थितीतही काजलने मोठा संयम आणि धीर दाखवला. आपल्याला मोठं होऊन आयपीएस होण्याची इच्छा असल्याचं तिने सांगितलं आहे.
आणखी वाचा
बुधवारी जम्मू काश्मीरमधील केरन सेक्टरमध्ये झालेल्या फायरिंमगमध्ये लान्स नायक रणजीत सिंह शहीद झाले. शहीद रणजीत सिंह यांच्या मुलीने यावेळी सांगितलं की, "आपण मोठे होऊन आयपीएस व्हावं अशी बाबांची इच्छा होती. एक दिवस मी नक्की आयपीएस होईन, आणि पाकिस्तानला धडा शिकवेन. दहशतवादाशी लढा देत माझ्या वडिलांच्या हौतात्म्याचा बदला घेऊन", असा निर्धारच काजोलने व्यक्त केला आहे.
काजलच्या सात वर्षाच्या भावानेही लष्कराच भरती होऊन वडिलांच्या हौतात्म्याचा बदला घेणार असल्याचं संकल्प केला आहे. शहीद रणजीत सिंह यांच्या अंत्यदर्शनासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रणजीत सिंह जम्मू काश्मीरच्या भलवाल परिसरातील राहणारे आहेत. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुलं आहेत.
लान्स नायक रणजीत सिंह यांच्यासोबत रायफलमॅन सतीश भगतही शहीद झाले. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्यांनी शस्त्रसंधी उल्लंघन केल्याने झालेल्या गोळीबारात दोघं शहीद झाले. दोन्ही जवानांना नियंत्रण रेषेवर तैनात करण्यात आलं होतं.
जम्मू आणि काश्मीरमध्ये सातत्याने कारवाया करून देशाच्या सुरक्षेस गंभीर धोका निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात लष्कराने जोरदार मोहीम उघडली आहे. गेल्या सात महिन्यांत लष्कराने जम्मू आणि काश्मीरमध्ये मिळून एकूण १०२ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर अनेक दहशतवादी लष्कराच्या हिट लिस्टवर आहेत. गेल्या सात वर्षात जानेवारी ते जुलैदरम्यान चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची ही सर्वाधिक संख्या आहे, अशी माहिती आज पोलिसांनी दिली आहे.
लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांच्या काश्मीरमध्ये कारवाया करत असलेल्या दहशतवाद्यांची हिट लिस्ट लष्कराने तयार केली आहे. त्या हिट लिस्टच्या आधारावर लष्कराकडून ऑपरेशन हंट डाऊन अंतर्गत दहशतवाद्यांचा खात्मा केला जात आहे.