राजस्थानमधील बिकानेर येथील श्रीडुंगरगड परिसरातून बेपत्ता झालेल्या एका खासगी शाळेतील 17 वर्षीय विद्यार्थिनीच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. बेपत्ता विद्यार्थिनी आणि तिच्या शाळेतील शिक्षकेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. चार मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये दोघींनी एकमेकांवरील प्रेम व्यक्त केलं आहे. विद्यार्थिनीने तिला कोणीही पळवून नेलं नसल्याचं म्हटलं आहे. ती स्वतःच्या इच्छेने शिक्षिकेसोबत आली आहे. तसेच दोघीही एकमेकींसोबत आनंदी असल्याचं म्हटलं आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
बेपत्ता विद्यार्थिनी आणि तिच्या शिक्षिकेचा व्हिडिओ सोमवारी व्हायरल आला आहे. हा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दोघींनी एकमेकींवरील प्रेम व्यक्त केलं आहे. आम्हाला प्रेम आणि शांततेने जगूद्या. विद्यार्थिनीने तिच्या पालकांची माफी मागितली आहे. लोकांनी या प्रकरणाला महत्त्व देऊ नये, अशी विनंती देखील केली आहे. आणि शिक्षिकेने सांगितलं की दोघीही एकमेकींसोबत खूप खूश आहेत. लोकांनी कोणताही गोंधळ घालण्याची गरज नाही.
बिकानेरच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ दोघींनी बनवला आहे. या संपूर्ण प्रकरणावर पोलीस तातडीने आवश्यक ती कारवाई करत आहेत. पोलिसांची चार पथके विद्यार्थिनीला शोधण्यासाठी पाठवली आहेत. डीएसटी आणि सायबर टीमही यात गुंतलेली आहे. हा व्हिडीओ कोठून अपलोड करण्यात आला, याचा तपास सुरू आहे. त्याच वेळी, व्हिडीओ सत्यता देखील तपासली जात आहे. शोध घेतल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
चार दिवसांपूर्वी 30 जून रोजी श्रीडुंगरगड शहरातील अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता झाली होती. त्याचवेळी त्या शाळेतील शिक्षिकाही गायब झाली. विद्यार्थिनी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी शाळेतील शिक्षिका आणि तिच्या दोन भावांवर गुन्हा दाखल केला. ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच ते संतप्त झाले. लव्ह जिहादचा आरोप करत मोठ्या जमावाने श्रीडुंगरगड पोलीस ठाण्याला घेराव घातला.
परिस्थिती पाहता पोलीस प्रशासन अलर्ट झालं आलं. श्रीडुंगरगड पोलीस ठाण्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून त्याचे छावणीत रूपांतर करण्यात आले. विद्यार्थिनीचे नातेवाईक, स्थानिक नेते आणि हिंदू संघटनांच्या प्रतिनिधींनी पोलीस प्रशासनाशी अनेकवेळा चर्चा केली आहे. प्रकरणाची संवेदनशीलता पाहून पोलिसांनी पथके तयार करून विद्यार्थिनीचा शोध सुरू केला, मात्र अद्यापपर्यंत कोणताही सुगावा लागलेला नाही. त्याचबरोबर लोकांचा रोषही वाढत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.