शिक्षक की वैरी?... गृहपाठ केला नाही म्हणून विद्यार्थिनीला 168 वेळा थोबाडीत मारलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 05:33 PM2018-01-27T17:33:19+5:302018-01-27T18:08:01+5:30
एका सरकारी शाळेत 12 वर्षीय विद्यार्थिनीने गृहपाठ न केल्याने शिक्षकाने अमानुषपणे शिक्षा दिल्याची घटना समोर आली आहे.
झाबुआ- मध्य प्रदेशातील आदिवासी बहुल झाबुआ जिल्हातील एका सरकारी शाळेत 12 वर्षीय विद्यार्थिनीने गृहपाठ न केल्याने शिक्षकाने अमानुषपणे शिक्षा दिल्याची घटना समोर आली आहे. गृहपाठ न केल्याने वर्गातीलच मुलींकडून सहा दिवस सतत या 12 वर्षीय मुलीला 168 वेळा थोबाडीत मारण्यात आल्या. विद्यार्थिनीच्या वडिलांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे या प्रकरणी तक्रार केली आहे.
जिल्हा मुख्यालयापासून 34 किलोमीटर अंतरावर थांदला तहसील मुख्यालयाजवळ जवाहर नवोदय विद्यालयातील सहावीच्या वर्गात शिकणारी ही मुलगी आहेत. अनुष्का सिंह असं तिचं नाव असून तिचे वडील शिवप्रताप सिंह यांनी तीन दिवस आधी या प्रकरणाची तक्रार शाळेच्या मुख्याध्यापकांकडे केली. मुलीची तब्येत ठिक नसल्याने तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं ज्यामुळे ती अभ्यास मागे पडली आहे.
आजारपणातून बरी झाल्यानंतर अनुष्का 11 जानेवारी रोजी पुन्हा शाळेत गेली. त्यादिवशी गृहपाठ न केल्याने विज्ञान विषयाचे शिक्षक मनोज कुमार वर्मा यांनी अनुष्काच्या गालावर तिच्या वर्गातील 14 मुलींना 11 ते 16 जानेवारी म्हणजेच सहा दिवस रोज 2-2 थोबाडीत मारायला सांगितल्या. या मारहाणीमुळे अनुष्काला मानसिक आणि शारीरिक धक्का बसला असून ती पुन्हा आजारी पडली. शिक्षकाच्या या कृत्यामुळे अनुष्का घाबरली असून तिला शाळेत जायलाही भीती वाटते आहे. अनुष्कावर थांदलाच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. अनुष्काच्या वडिलांनी ही संपूर्ण माहिती दिली आहे.
पीडित मुलीच्या वडिलांकडून याप्रकरणी तक्रार करण्यात आली. मेडिकल तपासात मुलीला जखम झाल्याचं आढळून आलं नाही. पण तिच्या वर्गातील मुलींनी या घटनेला दुजोरा दिला आहे, अशी माहिती थांदला पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक एसएल बघेल यांनी दिली.
यामध्ये सगळ्यात धक्कादायक म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक के. सागर यांनी शिक्षकाचा बचाव करत या शिक्षेला फ्रेंडली शिक्षा म्हंटलं आहे. जी मुलं अभ्यासात मागे असतात त्यांना विद्यालया नियमांनुसार शिक्षक शिक्षा देऊ शकत नाही. मुलीमध्ये सुधारण व्हावी म्हणून शिक्षक वर्माने इतर मुलींना सांगून तिला शिक्षा दिली. पण इतर मुलींनी तिला जोरात मारलं नाही. ही एक फ्रेंडली शिक्षा आहे पण तरीही या प्रकरणावर लक्ष दिलं जाईल. मुलीच्या पालकांना बोलावून याविषयावर चर्चा केली जाईल, असं स्पष्टीकरण शाळेचे मुख्याध्यापक के.सागर यांनी दिलं.