जयपूर: टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताननं भारतावर १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला. विश्वचषक स्पर्धेत भारत पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभूत झाला. त्यामुळे पाकिस्तानात सध्या आनंदाचं वातावरण आहे. मात्र भारतातही काही जणांना पाकिस्तानच्या विजयाचा आनंद झाला आहे. काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका शिक्षिकेनं पाकिस्तानच्या विजयानंतर व्हॉट्स ऍप स्टेटस टाकत आनंद व्यक्त केला. या शिक्षिकेला खासगी शाळेनं नोकरीवरून कमी केलं आहे.
उदयपूरमधील नीरजा मोदी शाळेत शिक्षिका असलेल्या नफीसा अटारी यांनी भारत-पाकिस्तान सामन्यानंतर व्हॉट्स ऍप स्टेटस ठेवलं. जीत गये, आम्ही जिंकलो अशा आशयाचं स्टेटस अटारी यांनी ठेवलं होतं. अटारींनी स्टेटसला ठेवलेल्या फोटोत पाकिस्तानचे सलामीवीर दिसत होते. तुम्ही पाकिस्तानला पाठिंबा देता का असा सवाल एका विद्यार्थ्याच्या पालकानं नफीसा यांना स्टेटस पाहून विचारला. त्यावर त्यांनी होय असं उत्तर दिलं.
नफीसा अटारी यांनी ठेवलेल्या स्टेटसचा स्क्रीनशॉट काही विद्यार्थ्यांनी काढला. त्यानंतर तो व्हायरल झाला. अटारी यांनी ठेवलेल्या स्टेटसची नीरजा मोदी शाळेच्या प्रशासनानं दखल घेतली. त्यांना निलंबित करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला. यासंबंधीचं पत्र प्रशासनाकडून जारी करण्यात आलं आहे. सोजतिया चॅरिटेबल ट्रस्टमधील बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार नफीसा अटारी यांना निलंबित करण्यात येत आहे, असं पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.