ऑनलाइन लोकमत -
केरळ, दि. १४ - दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेत चांगलं यश मिळावं यासाठी खासगी शिकवणी करणा-या शिक्षकाने चक्क 10 दिवसांचा उपवास ठेवला आहे. कोल्लम येथील वेणू या शिक्षकाने हा उपवास ठेवला आहे. कोल्लममधील कुंदरा येथे ते खासगी शिकवणी घेतात.
सध्या विद्यार्थ्यांची दहावी आणि बारावी बोर्डीची परिक्षा सुरु आहे. या परिक्षेत त्यांच्या क्लासमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळावेत यासाठी वेणू यांनी 10 दिवसांचा उपवास ठेवला असून चिंतनदेखील करत आहेत. श्री रामकृष्ण परमहंस यांच्या 151 तासांच्या उपवासावरुन त्यांनी ही प्रेरणा घेतली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
या उपवास, चिंतनामुळे तसंच विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे विद्यार्थ्यांना यश नक्की मिळेल अशी आशा वेणू यांनी व्यक्त केली आहे. वेणू यांनी आपल्यासमोर सर्व धर्माचे ग्रंथदेखील ठेवले आहेत. वेणू क्लाससोबत ध्यान लीला म्हणून आश्रमदेखील चालवतात. त्यांच्या या उपवासामुळे लोकांची येथे गर्दी होऊ लागली आहे.