ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. ६ - शिक्षिकेसोबत गैरवर्तन आणि छेडछाड केल्याच्या आरोपाखाली हैदराबाद पोलिसांनी रविवारी सकाळी आंधप्रदेश सरकारमधील मंत्र्याच्या मुलाला अटक केली. सुशील रावेला असे आरोपीचे नाव असून, तो आंध्रप्रदेशचे सामाजिक कल्याण मंत्री रावेला किशोर बाबू यांचा मुलगा आहे.
२० वर्षीय शिक्षिकेसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी सुशील आणि त्याच्या ड्रायव्हरला अटक केली आहे. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी सुशीलला अटक केली त्याला आज न्यायदंडाधिका-यासमोर हजर करण्यात येणार आहे.
सुशील आणि रमेशला नोटीस बजावली होती. त्यानंतर आज सकाळी ते स्वत:हून पोलिस स्थानकात हजर झाले. प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली अशी माहिती बंजारा हिल्स विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त उदय कुमार रेड्डी यांनी दिली.
पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार ती गुरुवारी शाळेच्य वाटेवर असताना आमदाराचा स्टिकर असलेली गाडी तिचा पाठलाग करत होती. गाडी जवळ आल्यानंतर ड्रायव्हर आणि आत बसलेल्या आरोपीने शेरेबाजी केली व आपल्याला आत खेचून घेण्याचा प्रयत्न केला असा आरोप पीडित महिलेने केला आहे. आपण आरडाओरडा केल्यामुळे जवळच असलेला नवरा आणि स्थानिक मदतीला धावून आले आणि त्यांनी आपली सुटका केली असे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.