कुरूक्षेत्र- ‘लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारण्यापासून ते समाजातील भ्रष्टाचाराचं निर्मूलन हे फक्त भगवत गीतेच्या शिकवणुकीमुळे शक्य होऊ शकतं. राजकारणालाही योग्य दिशा देण्याचं काम गीता करु शकते,’ असं वक्तव्य हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलं आहे. हरियाणातील कुरुक्षेत्र येथे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवांतर्गत आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.‘कायदा आणि न्यायव्यवस्थेमार्फत आपण भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेऊ शकतो. पण, समाजातील सगळ्या स्तरातून भ्रष्टाचाराचं निर्मूलन व्हावं तसंच लोकांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यामध्ये भगवत गीता महत्वाची भुमिका बजावू शकते, असं खट्टर यांनी म्हंटलं.
लोकांनी डिजिटल होणं ही सध्या संपूर्ण जगाची गरज आहे. डिजिटायझेशनमुळे सगळ्या प्रकारची माहिती आपल्याला एका क्लिकवर मिळते. यासाठी राज्य सरकारनेही विविध ई-सुविधांसाठी पुढाकार घेतला असून प्रशासनातील भ्रष्टाचार नियंत्रणासाठी पावलं उचलली आहेत. हरियाणातील 1150 गावांमध्ये 183 ई-सेवा पुरवण्यात येत असल्याचं खट्टर यांनी या कार्यक्रमात बोलताना म्हंटलं.
शांती आणि समृद्धीसाठी जगभरात भगवत गीतेचा संदेश पोहोचवण्याची गरज असल्याचं, या कार्यक्रमात बोलताना हरियाणाचे राज्यपाल कप्तान सिंह सोळंकी म्हणाले.