सुरेश भटेवरा,नवी दिल्लीसर्व क्षेत्रात मोदी सरकारचे कामकाज उत्तम प्रकारे चालले आहे. जनतेच्या या सरकारकडून मात्र खूपच अपेक्षा आहेत. अवघ्या १४ महिन्यांपूर्वी भाजपा केंद्रात सत्तेवर आली. अजून बराच काळ हातात आहे. या कालखंडात जनतेच्या अपेक्षा हे सरकार जरूर पुऱ्या करील, संघाला याची खातरी वाटते, अशी ग्वाही रा.स्व. संघाचे सरसहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी समन्वय बैठकीच्या समारोपाआधी भवनासमोरील खुल्या मैदानात रणरणत्या उन्हात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. संघातर्फे मोदी सरकारला मिळालेले हे खुले प्रशस्तिपत्रच आहे. भाजपा आणि रा.स्व. संघाच्या समन्वय बैठकीचा शुक्रवारी तिसरा व अंतिम दिवस होता. वसंत कुंज येथील मध्यांचल भवनात बैठकीच्या अंतिम टप्प्यात दुपारी ४.३0 वाजता पंतप्रधान मोदींचे आगमन झाले. बैठकीत त्यांची नेमकी भूमिका काय ? संघ कार्यकर्त्यांना ते संबोधित करणार आहेत की नाहीत? पंतप्रधानांकडून संघाच्या नेमक्या अपेक्षा तरी काय? याबाबतची माहिती पत्रकारांना होसबळे यांनी दिली नाही.बैठकीतील चर्चेविषयी बोलताना होसबळे म्हणाले, देशभर खेड्यातून शहरांकडे ग्रामीण जनतेचे स्थलांतर व पलायन सुरू आहे. ते त्वरित थांबावे यासाठी गावागावांत कमाई, पढाई आणि दवाई (रोजगार, शिक्षण व आरोग्याच्या सोयी) उपलब्ध झाल्या पाहिजेत.देशात शिक्षणाचे व्यापक बाजारीकरण झाले आहे, त्याऐवजी त्याचे भाारतीयकरण झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करीत होसबळे म्हणाले, महागड्या शिक्षण व्यवस्थेवर समन्वय बैठकीत चिंता व्यक्त झाली.ही बैठक सरकारच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी नव्हती तर त्या बैठकीत आम्ही देशाच्या विकासासंबंधी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली, असेही त्यांनी सांगितले.तिसऱ्या दिवशी गंगा सफाई अभियानाविषयी उमा भारतींनी सरकारी योजनेचे प्रेझेंटेशन दिले त्यात कालबद्ध योजनेचा अभाव असल्याने संघाने निराशा व्यक्त केली, अशी माहिती संघाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली.१२ केंद्रीय मंत्र्यांनी संघाच्या बैठकीत जवळपास पूर्णवेळ हजेरी लावली. त्यावर विरोधी पक्षांनी गेले दोन दिवस टीकेची झोड उठवली होती. यासंदर्भात एका प्रश्नाला उत्तर देताना होसबळे म्हणाले, रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या काँग्रेस पक्षाने रा.स्व. संघाला कोणतेही सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नये. वर्षातून दोनदा होणारी संघाची बैठक वैचारिक आदानप्रदानासाठी असते.संघाची पार्श्वभूमी असलेल्या केंद्रीय मंत्र्यांनी त्यात भाग घेतला आणि सरकारची भूमिका संघ कार्यकर्त्यांना समजावून सांगितली, त्यांच्या शंकांना उत्तरे दिली तर त्यात काय बिघडले? या बैठकीद्वारे मोदी सरकारला संघाने कोणताही अजेंडा दिलेला नाही.राम जन्मभूमीवर मंदिर उभारायला हवे, मात्र हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असल्याने त्याबाबत मी आत्ताच काहीही बोलू शकत नाही. - दत्तात्रय होसबळे, सह-सरकार्यवाह, रा.स्व. संघ
मोदी सरकारला संघाचे प्रशस्तिपत्र
By admin | Published: September 05, 2015 2:00 AM