नवी दिल्ली : तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील जगातील दिग्गज कंपनी अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टीम कुक यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारतात अॅपल उत्पादनांची निर्मिती व येथील कुशल तरुणांना आपल्यासोबत जोडण्याच्या शक्यतांवर त्यांनी चर्चा केली.प्रथमच भारत दौऱ्यावर आलेले कुक यांनी सायबर सुरक्षा आणि सांकेतिक भाषेतील डाटावरही विचारविनिमय केला. अॅपलच्या सीईओंनी भारत दौऱ्यादरम्यान बेंगळुरुमध्ये अॅप विकास केंद्र आणि हैदराबादेत उत्पादनांसाठी नकाशा चित्रण केंद्र स्थापन करण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. अॅपलतर्फे विशिष्ट प्रकारचे आयफोन आणि मॅक कॉम्प्युटरची निर्मिती केली जाते. यावेळी कुक यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांच्या मोबाईल अॅपचे अपडेटेड व्हर्जन सादर करण्यात आले. कुक यांच्या भेटीनंतर मोदी यांनी टिष्ट्वट करून टीम कुक यांना धन्यवाद दिले व आपले विचार आणि प्रयत्न नेहमीच समृद्ध करणारे असतात असे मनोगत व्यक्त केले. तसेच टिष्ट्वटर हॅडलवर अॅपल सीईओसोबत आपला फोटो सुद्धा टाकला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
टीम कुक यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2016 2:55 AM