ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही आणीबाणीला पाठिंबा दर्शवला होता, असा गौप्यस्फोट माजी आयबी प्रमुख ( गुप्तहेर विभाग) टी. व्ही. राजेश्वर यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
१९७५ साली जेव्हा देशात आणीबाणी लागू करण्यात आली तेव्हा राजेश्वर हे गुप्तहेर विभागाचे उपप्रमुख होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर संघाचे तत्कालिन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीला पाठिंबा दर्शवला, असे राजेश्वर यांनी सांगितले. तसेच संघाने इंदिरा गांधी व संजय गांधी यांच्याशी संपर्क वाढवण्याचाचा प्रयत्नही केला होता, असेही ते म्हणाले. मात्र इंदिरा गांधी संघाशी जवळीक साधण्यास फारश्या उत्सुक नव्हत्या असे राजेश्वर यांनी नमूद केले.
दरम्यान आणीबाणीच्या काळात कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल याची जाणीव इंदिरा गांधींना होती, मात्र त्याची गंभीरता त्यांनी जाणली नव्हती. देशातील नागरिकांच्या जीवनावर याचा काय परिणाम होणार आहे, याची त्यांना माहिती नव्हती, असेही राजेश्वर यांनी सांगितले.