ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. 13 - शेवटच्या षटकांमध्ये कर्णधार विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने केलेल्या सकारात्मक फलंदाजीमुळे इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी वाचवण्यात भारतीय संघाने यश मिळवले. आज कसोटीच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 310 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या सत्रामध्ये आघाडीचे फलंदाज धडाधड बाद झाल्याने भारतीय संघ पराभूत होतो की काय अशी चिन्हे दिसू लागली होती. पण विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने शेवटची दहा षटके खेळून काढत सामना वाचवला.
इंग्लंडने आपला दुसरा डाव तीन बाद 260 धावांवर घोषित करून भारतासमोर विजयासाठी 310 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर गौतम गंभीर शुन्यावर बाद झाला. त्यानंतर पहिल्या डावातील शतकवीर मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराने भारताचा डाव सावरला. पण पुजारा (18), विजय (31) आणि रहाणे (1) हे ठराविक अंतराने बाद झाल्याने भारताचा डाव अडचणीत आला.
पण विराट कोहली आणि अश्विनने पाचव्या विकेटसाठी 47 धावा जोडत सामना अनिर्णिततेकडे झुकवला. पण अश्विन (32) आणि वृद्धिमान साहा (9) हे बाद झाल्याने भारतीयांची धडधड वाढली. मात्र खेळपट्टीवर पाय रोवून उभा असलेला कर्णधार विराट कोहली (नाबाद 49) आणि रवींद्र जडेजा (नाबाद 32) यांनी शेवटच्या षटकांमध्ये इंग्रजांना यश मिळू न देता सामना अनिर्णित राखला. खेळ संपला तेव्हा भारताने दुसऱ्या डावात 6 बाद 172 धावांपर्यंत मजल मारली होती.
तत्पूर्वी, कालच्या बिनबाद 114 धावांवरून पुढे खेळताना इंग्लंडने 260 धावा फटकावत आपला दुसरा डाव घोषित केला. इंग्लंडकडून कर्णधार अॅलेस्टर कूकने (130) शतक तर हासिब हमीदने (82) अर्धशतक फटकावले.