हैदराबाद - राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस आणि भाजपेतर पर्याय देणारी सांघिक आघाडी (फेडरल फ्रंट) निर्माण करण्याची योजना तेलंगणचे मुख्यमंत्री व तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव करीत आहेत. टीआरएसचा २७ एप्रिल हा स्थापना दिवस असून त्या दिवशी ही आघाडी स्थापन होईल.गेल्या आठवड्यात राव यांनी गुणात्मक बदल घडवून आणण्यासाठी ते स्वत:ला राष्ट्रीय पातळीवर अतिशय सक्रिय ठेवू इच्छितात व समविचारी पक्षांचे व्यासपीठ तयार करण्यासाठी इतरांशी चर्चाही करीत आहे, असे म्हटले होते.तेलंगणात राव हे केसीआर या नावाने ओळखले जातात. टीआरएसच्या स्थापना दिनी २७ एप्रिल रोजी राव सांघिक आघाडी स्थापन करण्याचा व त्या दिवशी ते राष्ट्रीय नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती टीआरएसच्या वरिष्ठ नेत्याने दिली. आघाडी येथेच स्थापन होण्याची मोठी शक्यताही या नेत्याने बोलून दाखवली.आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलगू देसम पक्षाचे नेते एन. चंद्रबाबू नायडू, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांना आपल्यासोबत घेण्यासाठी तुमचा पक्ष त्यांच्याशी संपर्क साधणार का, असे विचारता टीआरएसमधील सूत्रांनी भाष्य करण्यास नकार दिला. भाजपच्याविरोधात आघाडी स्थापन करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना शह देण्यासाठी राव यांचे हे प्रयत्न असल्याच्या चर्चेबद्दल विचारले असता टीआरएसचे लोकसभेतील नेते ए. पी. जितेंद्र रेड्डी यांनी त्याचा इन्कार केला. रेड्डी म्हणाले, प्रत्येक पक्ष ते करू शकतो. लोक काँग्रेस तसेच भाजपला त्रासलेले आहेत. (वृत्तसंस्था)यांचा पाठिंबा असल्याचा दावापश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आॅल इंडिया मुस्लिम इत्तेहादूल मुस्लमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री व झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांच्यासह अनेक नेत्यांनी राव यांच्या प्रस्तावाला पाठिंबा दिल्याचा दावा टीआरएसने केला आहे.
तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांचे सांघिक आघाडीचे प्रयत्न, काँंग्रेस, भाजपाविरोधात समविचारी पक्षांना आणणार एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 1:48 AM