ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - वन रँक वन पेन्शन योजनेच्या मुद्यासंबंधी मध्यस्थी करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उतरला असून या योजनेसंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा अशी सूचना संघाने भाजपाला केली आहे. आजपासून दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा नेत्यांदरम्यान तीन दिवसीय समन्वय समितीच्या बैठकीला सुरूवात झाली. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत, प्रवीण तोगडिया तसेच भाजपाध्यक्ष अमित शहा, गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली आदी नेते बैठकीस उपस्थित होते. यावेळी सरकारने या मुद्यावर लवकरात लवकर पावले उचलावी अशी सूचना संघातर्फे करण्यात आली असून संघाच्या या सूचनेनंतर सरकार लवकरच या योजनेसंबंधी ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे.
आजच्या बैठकीत संघाच्या पदाधिका-यांतर्फे 'ओरओपी'साठी आंदोलन करणा-या सैनिकांची बाजू मांडली. 'देशाच्या रक्षणासाठी स्वत:च्या प्राणांची बाजी लावणा-या सैनिकांना आंदोलन करायला लावण योग्य नसून या वादावर तत्काळ तोडगा काढायला हवा. त्यामुळे सरकारची प्रतिमा उंचावण्यासही मदत होईल' अस मत संघाच्या पदाधिका-यांनी मांडले.
'वन रँक वन पेन्शन’साठी सेवानिवृत्त सैनिकांतर्फे दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या दोन महिन्यांपासून धरणे आंदोलन करण्यात येत आहे. मात्र अद्यापही सरकारने यासंबंधी कोणताही निर्णय जाहीर केला नसल्याने विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान येत्या काही महिन्यात बिहारची महत्वपूर्ण विधानसभा निवडणूक पार पडणार असून या निवडणुकीत नरेंद्र मोदी व भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारची प्रतिमा उंचावावी यासाठी संघ मध्यस्थीसाठी उतरला अाहे.