लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : यंदा ऐन सणासुदीच्या काळात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मानक संस्था क्रिसिलने जारी केलेल्या अहवालानुसार, खरीप हंगामास झालेला उशीर आणि इतर काही कारणांमुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कांद्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. अहवालात म्हटले आहे की, देशातील कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या भागांमध्ये ऑगस्ट महिन्यात अत्यल्प पाऊस पडला. अनेक ठिकाणी पाऊस पडलाच नाही. यामुळे कांद्याच्या लागवडीला उशीर झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून नवा कांदा बाजारात यायलाही उशीर होईल. त्यामुळे कांद्याचे भाव वाढू शकतात.
प्राप्त माहितीनुसार, भारतात कांद्याची मासिक गरज सरासरी १३ लाख टन आहे. खरिपाच्या हंगामास झालेल्या विलंबामुळे कांद्याचा विद्यमान साठा फार काळ पुरणार नाही. त्यातच तौक्ते चक्रीवादळानेही कांद्याचे नुकसान केले आहे. इतरही काही कारणांमुळे कांदा महाग होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. क्रिसिलने म्हटले की, ऑगस्ट महिन्यात पावसाच्या प्रमाणात ९ टक्क्यांची घट झाली आहे. कांद्याच्या उत्पादनात ३ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. तथापि, ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे उत्पादन बाजारात येईल. त्या आधीच कांद्याच्या दरात वाढ होईल.
२०१८ च्या तुलनेत दर होतील दुप्पट २०१८ च्या तुलनेत यंदा कांद्याचे दर १०० टक्क्यांनी (दुप्पट) वाढू शकतात. यंदा खरीप हंगामात कांद्याची घाऊक किंमत ३० रुपयांच्या पुढे जाऊ शकते. गेल्या वर्षी हा दर थोडा कमी होता. २०१८ हे कांद्याच्या दरांसाठी सामान्य वर्ष मानले जाते. यानंतर कांद्याचा दरात सतत वृद्धी होत आहे. २०२० मध्ये देखील कांद्याचे दर २०१८ च्या तुलनेत दुप्पट झाले होते.