नवी दिल्ली, दि. 7- मुलांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या ब्लू व्हेल चॅलेंज या गेमवर बंदी घालण्याची मागणी केली असली, तरी अशी बंदी करणं अशक्य असल्याचं मत मत इंटरनेट तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. विधानसभा आणि संसदेतही या गेमवर बंदी घालण्याची मागणी केली गेली. तसंच संकेतस्थळावरून तो गेम काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती. पण हा गेम मोबाइल किंवा संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतो, त्यामुळे त्यावर बंदी घालणं शक्य नाही, असं ‘सेंटर ऑफ इंटरनेट अँड सोसायटी’ या संस्थेचे उद्भव तिवारी यांनी सांगितलं आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.
या गेमसाठी कुठलं एक विशिष्ठ संकेतस्थळ नाही. त्यामुळे सगळ्या इंटरनेटवरच बंदी घातली तर हा गेम रोखता येईल, पण ते अशक्य आहे. या गेमचा प्लेस्टोअरवर किंवा संकेतस्थळांवर शोध घेतला तर तो सापडत नाही, त्यासाठी त्याचे निर्माते संभाव्य वापरकर्त्यांशी संपर्क साधतात. सध्या ब्लू व्हेल गेमला पर्याय म्हणून आणखी एक गेम तयार करण्यात आला आहे. यामध्ये ब्लू व्हेल मासा सगळे अडथळे पार करत पुढे जातो. या नव्या गेमध्ये मुलांना विविध टास्क करायला सांगतात. जसं की, व्यायाम करा, पुश अप्स करा. या खेळाच्या सगळ्या स्टेज पूर्ण झाल्यावर तुमचं जीवन अमूल्य आहे, असा संदेशही देण्यात येतो. या गेमची लिंक सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली.
पण सगळ्यासांठी घातक असलेला ब्लू व्हेल गेम ५० दिवसांच्या आव्हानांचा असून तो रशियात तयार झाला. या खेळामुळे रशियात १३० जणांचा बळी गेला आहे. मुंबईच्या मनप्रीत सहानी याने ३० जुलैला सात मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. तो ब्लू व्हेलचा भारतातील पहिला बळी होता. या गेमचे प्रशासक हे विविध ऑनलाइन पोर्टल वापरून मुलांपर्यंत किंवा लोकांपर्यंत पोहोचतात. त्यात इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्स अॅप तसंच इतर ऑनलाइन पोर्टलचा समावेश असल्याचं,तिवारी यांनी सांगितलं.
इन्स्टाग्राम आणि फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइट्सने आता ब्लू व्हेल गेम विरोधात उपाययोजना सुरू केल्या आहेत. यामध्ये युजरला जर या गेमचा हॅशटॅग आला तर युजरला लगेचच हेल्प पेजकडे नेले जाईल, त्यात टॉक टू अ फ्रेंड, काँटॅक्ट हेल्पलाइन आणि गेट टिप्स अँड सपोर्ट हे पर्याय दिले आहेत. त्यातून या गेममधून निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यातून आपण बाहेर पडतो. या शिवाय पालकांनी मुलं इंटरनेटवर काय सर्च करतात, यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे, असंही मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
रशियाचा बावीस वर्षीय तरुण फिलीप बुडेकिन याने या गेमची निर्मिती केली आहे. त्याला गेल्या नोव्हेंबरमध्ये अटक झाली. ज्या लोकांची जगण्याची लायकी नाही, त्यांना जगातून घालवण्याचा हेतू या चॅलेंज गेममध्ये आहे, असं त्याने त्यावेळी सांगितलं होतं.