अंबाला- सिनेमात एखाद्याचं अपहरण करून त्यांच्या कुटुंबीयांकडून पैसे मागितल्याचे सिन दाखविले जातात. कमी वेळात जास्त पैसा मिळवून देणारी सोपी पद्धत असं काहीसं अपहरणाचं काल्पनिक वर्णन सिनेमातून केलं जातं. पण अनेक जण सिनेमातील काल्पनिक दृश्यांचं खऱ्या आयुष्यात अनुकरण करताना दिसताना. असाच एक प्रकार अंबालामध्ये घडला आहे. सोप्या पद्धतीने पैसे कमाविण्यासाठी एका सोळा वर्षाच्या तरूणाने पाच वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण केल्याची घटना घडली आहे. गुरूवारी या तरूणाला चिमुरडीचं अपहरण करून तिची हत्या केल्या प्रकरणी अटक झाली. आरोपी तरूणाने चिमुरडीचं अपहरण करून पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने चिमुरडीचा मृतदेह त्याच्या घरातील कुलरमध्ये लपवून ठेवला.
अपहरण व हत्येचा गुन्हा करायाला सिनेमाच्या सिन्समुळे प्रवृत्त झालो होतो. सोप्या पद्धतीने पैसे कमावण्यासाठी हा गुन्हा केल्याची, अशी कबूली आरोपी मुलाने पोलिसांसमोर दिली आहे. पाच वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण करून तिच्या वडिलांकडे 20 लाख रूपयांची मागणी केली होती. चिमुरडीच्या वडिलांचं अंबालातील गावात फोटो स्टुडिओ आहे. पोलीस आपल्या मागावर असल्याचं तरूणाला समजल्यावर त्याने चिमुरडीचं हत्या केली.
चिमुरडीच्या वडिलांनी त्यांचं दुसरं घर आरोपी मुलाच्या मेहुण्याला भाड्याने दिलं होतं. घटनेच्या वेळी आरोपी मुलगा त्या घरात एकटा होता. त्याचं कुटुंबीय उत्तर प्रदेशला गेलं होतं. चिमुरडीचे वडील आरोपी मुलाला रोजचं जेवण व इतर गोष्टी पुरवत होते. आरोपी हा अंबाला सरकारी शाळेत अकरावीत शिक्षण घेतो आहे.
चिमुरडी बुधवारी घराजवळ खेळत असताना आरोपी तरूणाने तिचं अपहरण केलं. मुलगी हरविल्याची तक्रार करताना मुलीच्या वडिलांना खंडणीसाठी फोन आला. पोलिसांनी तो फोन कॉल ट्रेस केला व मुलाचं घर गाठलं. केलेल्या गुन्ह्याचा मुलाला जराही पश्चाताप नव्हता. पोलीस जेव्हा आरोपी मुलाच्या घरी गेले तेव्हा तो शांतपणे लॅपटॉपवर काम करत होता, अशी माहिती पोलीस अधिकारी अभिषेक जोरवाल यांनी दिली आहे.