राहत्या घरात आई-वडिलांनी कुत्रा पाळू न दिल्यानं एका १६ वर्षीय मुलानं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे ही घटना घडली आहे. शहराच्या व्यंकटेश्वरा मेट्टा परिसरात षण्मुख वामसी या १६ वर्षीय मुलानं राहत्या घरात पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली.
आत्महत्या केलेल्या मुलाची कुत्रा पाळावा अशी इच्छा होती. त्यासाठी त्यानं ३० हजार रुपयांचा कुत्रा घेऊन देण्याचा हट्ट आई-वडिलांकडे केला होता. पण पालकांनी त्याला परवानगी दिली नाही. एका ऑनलाइन मार्केटिंग वेबसाइटवर त्यानं हा कुत्रा पाहिला होता. षण्मुख वामसी याच्या आईला मात्र हे मान्य नव्हतं. सध्या नको आपण नंतर कधीतरी नक्की घेऊन असंही आईनं मुलाला सांगितलं होतं. पण निराश झालेल्या षण्मुख यानं थेट आत्महत्या करण्याचं पाऊल उचललं. या घटनेनं सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
षण्मुखची आई सोमवारी घरगुती वस्तू आणण्यासाठी बाजारात गेल्या होत्या. पण त्या घरी परतल्या त्यावेळी षण्मुखनं आत्महत्या केल्याचं पाहून त्या जागेवरच कोसळल्या. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं पण तोवर खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं. एमआर पेट्टा येथील पोलीस ठाण्यात याची दखल घेऊन तक्रार दाखल करुन घेण्यात आली आहे. याप्रकरणाची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.