मध्य प्रदेशमधील रतलामच्या कॉलेजमधील मैदानात धावत असताना एका मुलाची प्रकृती अचानक बिघडली आणि नंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष सकाळी सहा वाजताच्या सुमारास मित्रांसोबत कॉलेजच्या मैदानात धावण्यासाठी गेला होता. काही वेळाने रुग्णालयामधून त्याच्या मित्राचा फोन आला आणि कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले, तिथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, आशुतोष कॉलेजच्या मैदानावर धावत असताना अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडला. यानंतर त्याच्या मित्रांनी आणि इतर काही लोकांनी त्याला रुग्णालयात नेलं. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, आशुतोषचं सैन्यात भरती होण्याचं स्वप्न होतं. तो अकरावीत शिकत होता. गेल्या काही दिवसांपासून तो मित्रांसोबत कॉलेजच्या मैदानावर धावण्यासाठी जात होता. आशुतोष घरीही व्यायाम करायचा.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्याला कोणताही आजार नव्हता. सोमवारी रात्रीही त्याने टीव्ही पाहिला आणि सकाळी त्याच्या मित्रासोबत धावायला गेला. अचानक झालेल्या या घटनेमुळे आशुतोषच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे. हे कसं घडलं ते समजत नाही. एवढ्या लहान वयात आशुतोषला सायलेंट अटॅक कसा काय येऊ शकतो, हे कुटुंबीय मान्य करायला तयार नाहीत.
तरूण वयात अकस्मात मृत्यूच्या घटनांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. 29 जानेवारी रोजी जिल्ह्यातील खारवकला येथील 13 वर्षीय मंगल डांगीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. याआधी 29 जानेवारीला रतलामहून मंदसौरला जाणाऱ्या बसचा चालक जफर मेओ याचाही अचानक आलेल्या अटॅकमुळे मृत्यू झाला होता. चालत्या बसमध्ये अचानक तब्येत बिघडल्याने जफरने बस बाजूला नेली आणि तो बेशुद्ध पडला. यानंतर काही लोकांनी त्याला रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आलं.