बंगळुरू - महाराष्ट्रासह, केरळ आणि कर्नाटकमध्येही मुसळधार पावसामुळे नद्यांना महापूर आला आहे. या महापूराचा कित्येक जिल्ह्यांना फटका बसला असून लाखो नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या महापुरात माणूसकी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. पद, प्रतिष्ठा, पैसा, बडेजावपणा हे सर्व बाजुला सारून प्रत्येकाने आपापल्या परीने पूरग्रस्त जिल्ह्यांना मदत केली.
एनडीआरएफ आणि सैन्याच्या जवानांनी जीवाची बाजी लावून हजारो नागरिकांचे जीव वाचवले. तर, लाखो नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचवले आहे. तर, लाखो हात पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी पुढे आले आहेत. पूरग्रस्त भागात मदतकार्य जोमाने सुरू असून अन्नधान्यापासून ते सर्वच अत्यावश्य वस्तूंची मदत पोहोचविण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनासहस, सरकार, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तीही पुढे येत आहेत. कर्नाटकच्या दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील बेल्थानगडी तालुक्याचे तसहिलदार चक्क स्वत:च्या डोक्यावर तांदळाचे पोते वाहून नेताना दिसत आहेत. पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी हे साहेब कुठलाही बडेजाव न मिरवता, आल्या संकटाला सामोरे जाताना स्वत:मधील माणूसकीचे दर्शन जगाला घडवत आहेत.
गणपती शास्त्री असे या तहसिलदारांचे नाव असून एका तात्पुरत्या स्वरुपात बांधण्यात आलेल्या पुलावरुन ते मार्ग काढत गावातील लोकांना अन्नधान्य पुरविण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. या संवेदनशील वृत्तीमुळेच नागरिकांनाही धीर मिळत असून इतरांनाही काम करण्याची, पडलेलं घर उभारण्याची आणि या संकटातून सावरायची प्रेरणा व ऊर्जा मिळते.