नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची एकूण संख्या ही दोन कोटींच्या वर गेली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,22,315 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4,454 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. कोरोना लसीकरण सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी अद्यापही लोकांनी कोरोना लस घेतली नसल्याने लसीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे. सध्याच्या संकटात लस किती महत्त्वाची आहे हे पटवून दिलं जात आहे. मात्र याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना घडली आहे.
लसीकरणाबाबत जनजागृती करणाऱ्या पथकावर गावकऱ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य प्रदेशमधील उज्जैनजवळील मालीखेडी गावामध्ये कोरोना लसीकरणाबाबत माहिती देण्यासाठी एक आरोग्य पथक पोहचलं होतं. मात्र गावामध्ये लसीकरणासाठी आरोग्य पथक आल्याचं समजताच गावकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. कोरोना लस घेण्यासाठी नकार तर दिलाच पण यासोबतच पथकाचं म्हणण ऐकून न घेता त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. गावकऱ्यांनी केलेल्या या हल्ल्यामध्ये मध्यस्ती करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीलाही मारहाण करण्यात आली. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
उज्जैनच्या मलखेडी गावात लसीकरणासाठी गेलेल्या आरोग्य विभागाच्या पथकात तहसीलदार व अन्य अधिकाऱ्यांचादेखील समावेश होता. लसीकरणाबाबत लोकांच्या मनात भीती आहे. त्यामुळेच त्यांनी असा हल्ला केल्याचं म्हटलं जात आहे. सोमवारी सकाळी लसीकरणासाठी आरोग्य पथक गावामध्ये दाखल झालं होतं. त्यावेळी गावकऱ्यांनी या पथकावर हल्ला केला. गावातील सहाय्यक सचिव असणाऱ्या महिलेचे पती हे या संदर्भात गावकऱ्यांची समजूत काढण्यासाठी पुढे गेले होते. गावकऱ्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
एका पित्याने काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे आपला दोन्ही मुलाला गमावलं होतं. एका मुलाचे अंत्यसंस्कार होत नाहीत. तोपर्यंत दुसऱ्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. नोएडाच्या जलालपूर गावात ही मन सुन्न करणारी घटना घडली होती. यानंतर आता पित्याचा ही कोरोनामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. कोरोना उपचारादरम्यान अतार सिंह यांचा मृत्यू झाला आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता अताप सिंह यांच्या कुटुंबात एकच मुलगा शिल्लक आहे. अतार सिंह यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनामुळे आपल्या डोळ्यांसमोर दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे.
अतार सिंह यांचा मुलगा पंकज सिंह यांच निधन झालं. त्यानंतर आपल्या काही नातेवाईकांसोबत त्याचा अंत्यविधी करण्यासाठी अतार सिंह गेले. ते स्मशानभूमीतून परत आल्यावर त्यांच्या दुसऱ्या मुलाचंही कोरोनामुळे निधन झाल्याचं समजलं. दोन मुलांच्या मृत्यूनंतर अतार सिंह यांना मोठा धक्का बसला होता. मुलाच्या मृत्यूच्या काही दिवसांनंतर त्यांना देखील कोरोनाची लागण झाली. मात्र रात्री तब्येत अचानक खराब झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथेच त्यांचा मृत्यू झाला. गावात कोरोना मृतांची संख्या वाढत आहे.