गेल्या काही वर्षांपासून लालू प्रसाद यादवांच्या दोन मुलांमध्ये सुरु असलेली धुसफुस आता मोठ्या वादळात रुपांतरीत होणार आहे. तेजप्रताप यादव यांनी लालू प्रसाद यांना भेटून पक्ष सोडणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे तेजस्वी यादव यांचेच राजदवर एकहाती वर्चस्व निर्माण होण्याची शक्यता आहे.
तेज प्रताप यादवांवर आरजेडीचे युवा महानगर अध्यक्ष रामराज यादव यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. यावर तेजप्रताप यांनी आपण पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान करत असल्याचे सांगत राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे. याबाबत चे ट्विट त्यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी तेज प्रताप यादवांना मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत खूप वेळ बोलताना पाहिले गेले होते. त्यानंतर त्यांनी सरकार बनवत असल्याचा दावा केला होता. मात्र, आज त्यांनी पक्षाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. नितीशकुमार यांच्या भेटीमुळे असे काय घडले की तेजप्रताप यांनी थेट राजीनामा देण्याची घोषणा केली, तेजप्रताप यांच्यासोबत किती आमदार आहेत, जे त्यांनी सरकार स्थापन करण्याचा दावा केला, याची उत्तरे अद्याप अनुत्तरीत आहेत.
काय आहेत आरोप?रामराज यादव यांनी तेजप्रताप यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इफ्तार पार्टीच्या दिवशी एका खोलीत बंद करून आपल्याला मारहाण करण्यात आली आणि आक्षेपार्ह व्हिडीओ काढण्यात आल्याचे म्हटले आहे. यामुळे मी खूप दु:खी असून मारहाणीमुळे मला धक्का बसला आहे. यातून बाहेर पडून मी आता आरजेडी कार्यालयात राजीनामा देण्यासाठी आलो आहे, असे ते म्हणाले. तसेच एखाद्या गुन्हेगाराच्या हातून तुला मारुन टाकणार अशी धमकी देखील दिल्याचे ते म्हणाले. शिवाय माझी पुढील काळात हत्यादेखील होऊ शकते, असा आरोप रामराज यादव यांनी लावला आहे.