पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या सुरक्षेत केंद्र सरकारने कपात केली आहे. सरकारने लालू यांची सुरक्षा झेड प्लस (Z+) वरून झेड (Z) केली असून त्यांना देण्यात आलेले एनएसजी कमांडोंचे सुरक्षा कवच काढून घेण्यात आले आहे. यावर रागाच्या भरात लालू यांचे पुत्र तसेच बिहारचे माजी आरोग्य मंत्री तेज प्रताप यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे.
बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या मुलाच्या लग्नात तोडफोड करण्याची धमकी दिल्यानंतर आता तेज प्रताप यादव यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चामडी सोलून काढू, असं वादग्रस्त विधान तेज प्रताप यादव यांनी केले आहे.
दरम्यान, यापूर्वी तेज प्रताप यादव यांनी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती. तेज प्रताप यादव म्हणाले होते की, 'मला सुशील मोदी यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी निमंत्रण दिलं आहे. जर मी तिथे गेलो तर तिथेच त्यांची पोलखोल करणार'.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या 23 नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत देशभरातील व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपींच्या सुरक्षेचा आढावा घेतला. त्यावेळी काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय झाला. यात लालूंच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे. लालूंची झेड प्लस सुरक्षा काढून त्यांना झेड सुरक्षा देण्यात आली. तसंच संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष शरद यादव यांच्या झेड सुरक्षेत कपात करून ती वाय (Y) केली आहे.
या बैठकीत लालू प्रसाद यादवांसोबत शरद यादव, जितन राम मांझी यांच्यासोबतच गुजरातचे राज्यमंत्री हरिभाई पार्थी, सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश टी. एस ठाकूर, जामा मशिदीचे शाही इमाम एम.एस.ए बुखारी, दिल्लीचे माजी राज्यपाल नजीब जंग आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.