ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. १७ - ३३ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर हवाई दलाच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज झालेले तेजस विमान आज हवाई दल प्रमुख अरुप रहा यांनी चालवले. तेजस विमान चालवणारे ते पहिले हवाईदल प्रमुख आहेत. बंगळुरुमधील हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या तळावर त्यांनी तेजस विमान उड्डाणाचा अनुभव घेतला.
जास्तीत जास्त स्वदेशी तंत्रज्ञान वापरुन निर्मिती करण्यात आलेल्या तेजस प्रकल्पाची सुरुवात ८० च्या दशकात झाली होती. तेजसच्या आतापर्यंत ३०५० चाचण्या झाल्या असून, २००१ मध्ये तेजसने पहिले उड्डाण केले होते. तेजस हवाई दलातून निवृत्त झालेल्या मिग-२१ विमानांची जागा घेणार आहेत.
भारतीय वायूदलाकडे सध्या ३३ स्क्वाड्रन आहे. प्रत्येक स्क्वाड्रनमध्ये १६ ते १८ विमाने आहेत. या स्क्वाड्रनमध्ये जुन्या मिग-२१ आणि मिग-२७ विमानांच्या ११ स्क्वाड्रन आहेत. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा विचार करता आपल्याकडे ४५ स्क्वाड्रन सज्ज असली पाहिजेत. चार विमानांसह तेजसचे पहिले स्क्वाड्रन जुलै महिन्यात वायूदलात दाखल होणार आहे.