नवी दिल्ली - भारतीय हवाई हद्दीच्या संरक्षणासाठी एकटया 'तेजस'वर अवलंबून चालणार नाही. स्वदेशी बनावटीचे हे लढाऊ विमान स्वसंरक्षणासाठी पुरेसे ठरणार नाही असे भारतीय हवाई दलाकडून केंद्र सरकारला स्पष्ट करण्यात आले आहे. अन्य देशांकडून सिंगल इंजिन लढाऊ विमाने खरेदी करण्यायाचा विचार सोडून द्या असे केंद्राकडून सांगण्यात आल्यानंतर हवाई दलाने सरकारला तेजसच्या क्षमतेची कल्पना दिली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. जेएएस 39 ग्रिपेन, एफ-16 या लढाऊ विमानांशी तेजस स्पर्धा करु शकत नाही. ग्रिपेन, एफ-16 च्या तुलनेत तेजसमध्ये अजून भरपूर सुधारणांची आवश्यकता आहे असे हवाई दलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ग्रिपेन हे स्वीडीश बनावटीचे तर एफ-16 हे अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन कंपनीने बनवलेले फायटर विमान आहे. परदेशी लढाऊ विमानांऐवजी स्वदेशी बनावटीच्या भारतीय लढाऊ विमानांना प्राधान्य द्या असे केंद्राकडून हवाई दलाला सांगण्यात आले होते. त्यावर हवाई दलाने सरकारसमोर प्रेझेंटेशन सादर केले व एकटे तेजस भारताच्या सर्व हवाई गरजा पूर्ण करु शकत नाही ते निदर्शनास आणून दिले. युद्धाच्या प्रसंगात तेजस फक्त 59 मिनिटे तग धरु शकते तेच ग्रिपेन तीन तास तर एफ-16 चार तास लढण्यास सक्षम आहे.
तेजस फक्त तीन टनांचे पे-लोड वाहू शकते तेच ग्रिपेन सहा आणि एफ-16 सात टनाचे पे-लोड वाहून नेण्यास सक्षम आहे. इंडिया टुडेला मिळालेल्या कागदपत्रातून ही माहिती समोर आली आहे. दुस-या शब्दात सांगायचे झाल्यास एखाद्या टार्गेटला नष्ट करण्यासाठी 36 बॉम्बची आवश्यकता असेल तर अशावेळी सहा तेजस विमाने तैनात करावी लागतील तर ग्रिपेन आणि एफ-16 ची तीन विमानेही यासाठी पुरेशी आहेत.
अन्य दोन विमानांच्या तुलनेत तेजसचा देखभालीचा खर्चही जास्त आहे. ग्रिपेन आणि एफ-16 चे आयुष्य 40 वर्षांचे आहे तर, तेच तेजसचे आयुष्य 20 वर्षांचे आहे. टप्प्या टप्याने निवृत्त होणा-या मिग-21 ची जागा घेण्यासाठी भारताला सिंगल इंजिन फायटर विमानांची गरज आहे. एकाचवेळी चीन आणि पाकिस्तानने युद्ध पुकारले तर अशावेळी दोन्ही आघाडयांवर लढण्यासाठी भारताला 42 फायटर स्कवाड्रनची गरज आहे. पण सध्या भारताकडे 33 स्कवाड्रन आहेत. पुढच्या दोनवर्षात हवाई दलातून आणखी 11 स्कवाड्रन निवृत्त होणार आहेत.