मडगाव (पणजी) : ‘भविष्यातील रेल्वे प्रवास’अशी बिरुदावली मिरवत मुंबई - गोवा मार्गावर सुरू करण्यात आलेली आलिशान तेजस एक्सप्रेसला रेल्वे सुरक्षा कमिशनरकडून सुरक्षा मान्यता घेण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.कमिशनर आॅफ रेल्वे सेफ्टी ( सीआरएस) ही स्वायत्त संस्था असून, नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अख्यातरित ही संस्था येते. या संस्थेने अलिकडेच रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहून सुरक्षतेबाबत कुठलेही प्रमाणपत्र न घेता तेजस एक्सप्रेस का सुरू करण्यात आली, असा प्रश्न विचारला होता. तेजस रेल्वेत अनेक खास वैशिष्ट्ये आहेत. ती वैशिष्ट्ये न वापरता ही रेल्वे सध्या सुरू असल्याचे उत्तर रेल्वेकडून देण्यात आले आहे. नवीन वैशिष्ट्यासह गाडी धावत असेल तर त्याला सुरक्षा प्रमाणपत्राची गरज असल्याचेही नमूद केले आहे. सुरक्षिततेच्या प्रमाणपत्राविना रेल्वे सुरू करणे म्हणजे रेल्वे मंडळ योजना परिपत्रक ६ चे उल्लंघन असल्याची माहिती सीआरएसने दिली. याविषयी अद्याप आपल्या कार्यालयाला अधिकृत माहिती आलेली नाही, असे कोकण रेल्वेचे स्थानिक जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे म्हणाले.
सुरक्षा मान्यतेशिवाय ‘तेजस’ पटरीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 3:44 AM