पंतप्रधान नरेंद्र मोदींना वर्ल्डकपची फायनल हरल्यापासून विरोधकांकडून पनवती असे संबोधले जात आहे. यातच मोदींनी तेजस लढाऊ विमानातून सैर केल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. तृणमूलचे खासदार एवढ्यावरच थांबले नाहीत, जुन्या गोष्टींशी संबंध जोडताना त्यांनी असे काही वक्तव्य केले आहे की आता पुन्हा नवा वाद सुरु झाला आहे. भाजपाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
टीएमसी खासदार शांतनू सेन यांनी पंतप्रधान मोदींच्या 'पनवती'वर कमेंट केली आहे. जेव्हा मोदी देशात होते, तेव्हा इस्रोचे मिशन फेल झाले. जेव्हा कंगना मोदींना भेटली, तेव्हा तिचा सिनेमा सुपर फ्लॉप झाला. जेव्हा विराट कोहलीने मोदींशी हात मिळविला तेव्हा सलग तीन वर्षे त्याला शतकच ठोकता आले नाही, असे सेन म्हणाले.
परंतू, पुढे त्यांनी या गोष्टींना तेजस लढाऊ विमानाशी जोडले आणि वाद ओढवून घेतला. वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ सलग १० सामने जिंकत होता, परंतू मोदी त्या स्टेडिअममध्ये गेले आणि फायनल हरला, असे सांगताना मला भीती वाटतेय की मोदी तेजस विमानात बसले, आता ते लवकरच अपघातग्रस्त होणार तर नाही ना... असे सेन म्हणाले आहेत.
हे लोक केवळ पंतप्रधान मोदींचा द्वेष करत नाहीत तर त्यांना देशाचे कल्याणही नको आहे, अशी टीका भाजपाने केली आहे. प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण आहे की पंतप्रधान तेजसमध्ये उड्डाण करत होते, जे स्वदेशी उत्पादन आणि देशाच्या अभिमानाचे प्रतीक आहे, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी म्हटले आहे.