नवी दिल्ली - Tejasvi Yadav on BJP ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीनिमित्त देशात सध्या प्रचाराला वेग आला आहे. त्यात अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर दिल्लीत विरोधी पक्षांनी लोकतंत्र बचाओ महारॅलीचं आयोजन केले. त्यातून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला. राजधानी दिल्लीत रामलीला मैदानात राहुल गांधींनी मोदींवर मॅच फिक्सिंगचा आरोप लावला तर दुसरीकडे तेजस्वी यादव यांनी सत्ताधाऱ्यांवर द्वेषाचं राजकारण करत असल्याची टीका केली.
तेजस्वी यादव म्हणाले की, आम्ही देशात कुठेही जात आहोत तिथे आम्हाला जनतेचं समर्थन मिळत आहे. देशात अघोषित आणीबाणी लागली आहे. आम्ही पहिली पटणा, मग मुंबई आणि आता तिसरी रॅली दिल्लीत करत आहोत. भाजपा सरकार ज्यारितीने देशाचं विभाजन करत आहे, द्वेषाचे राजकारण करत आहे त्याविरोधात होणाऱ्या लढाईत तुम्ही आम्हाला साथ द्यावी असं आवाहन त्यांनी केले.
तसेच लोकशाहीत जनता मालक आहे. अबकी बार ४०० पार बोलणारे तोंडावर पडणार आहेत. देशात बेरोजगारी, महागाई, गरिबी हे शत्रू आहेत. मागील काळात मोदींनी सर्व गोष्टींचे खासगीकरण केले. आम्ही १७ महिन्यात बिहारमध्ये ५ लाख लोकांना रोजगार देण्याचं काम केले. आज शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. युवक त्रस्त आहे परंतु पंतप्रधानांना शेतकऱ्यांना भेटण्याचाही वेळ नाही. मोदी प्रियंका चोप्रा यांना भेटतात, पण शेतकऱ्यांना नाही असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं.
"तूम तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो"
तेजस्वी यादव यांनी या महारॅलीत सरकारने लोकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तताही केली नसल्याचा आरोप केला. यासाठी तेजस्वी यादवांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध गाणं, तू तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो असं म्हणत केंद्रीय तपास यंत्रणांकडून ईडी, सीबीआय कारवाईमागे भाजपा असल्याचं सांगितले. आम्ही घाबरणारे नाही. ज्यारितीने हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल यांना अटक केली गेली. आम्ही वाघ आहोत संघर्षातून मागे हटणार नाही असा इशारा तेजस्वी यादवांनी दिला.