Amit Shah vs Tejashwi Yadav: बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडून तेजस्वी यादव यांच्या पक्षासोबत सत्ता स्थापना केली. तेव्हापासून भाजपाचे नेतेमंडळी नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका करताना दिसतात. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका केली. पंतप्रधान पदाच्या हव्यासापोटी नितीश कुमार यांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि लालू प्रसाद यांनी आयुष्यभर भांडणं लावण्याचीच कामे केली, असे आरोप अमित शाह यांनी केले. त्यावरून बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी अमित शाह यांच्यावर पलटवार केला.
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना प्रत्युत्तर देताना घणाघात केला. "अमित शाह कोणाला घाबरवण्यासाठी येथे आले आहेत का? ते देशाचे गृहमंत्री आहेत पण असे का वागत होते? माझ्या दृष्टीने ते राजकीय नेते किंवा गृहमंत्री नाहीत. ते इथे आले तेव्हा त्यांचा आवेष कसा होता ते मला दाखवून द्यायचे नाही. पण आज ते काहीच नवीन बोललेले नाहीत. अमित शाह कशासाठी आले आहेत आणि ते काय बोलणार हे सगळ्यांनाच माहीत होते कारण त्यांच्याकडे आता बोलण्यासारखे काहीच शिल्लक राहिलेले नाही"
लालूंबद्दल अमित शाह म्हणाले...
"बिहारची भूमी नेहमीच परिवर्तन घडवून आणण्यात अग्रेसर राहिली आहे. भाजपशी गद्दारी करून नितीशजींनी स्वार्थ आणि सत्तेचे राजकारण दाखवून दिले. त्यांना सत्तेपासून दूर करण्याची सुरुवातही बिहारच्या भूमीतूनच होईल. आज मी सीमावर्ती जिल्ह्यात आलो आहे, त्यामुळे लालूजी आणि नितीशजींच्या पोटात दुखत आहे. मी बिहारमध्ये भांडणं लावण्यासाठी आलोय आणि जाताना काही तरी करूनच जाईन असा आरोप ते लोक करत आहेत. मला लालूजींना सांगावेसे वाटते की भांडणं लावण्यासाठी माझी गरज नाही. तुम्ही त्यासाठी पुरेसे आहात, कारण तुम्ही आयुष्यभर लोकांमध्ये भांडणं लावण्याचंच काम केलं आहे", अशा शब्दांत शाह यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावरही टीकास्त्र सोडले.