नवी दिल्ली/पाटणा : बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव मोठ्या संकटात सापडू शकतात. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अर्जावरून दिल्लीतील विशेष न्यायालयाने तुमचा जामीन रद्द का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारी नोटीस तेजस्वी यांना बजावली आहे. सीबीआयचा अर्ज मंजूर झाल्यास आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणातील जामीन रद्द होऊन त्यांना कारागृहात जावे लागू शकते.
तेजस्वी यांनी कथितरीत्या एका पत्रकार परिषदेत सीबीआय अधिकाऱ्यांना धमकी दिली होती. त्यावरून सीबीआयने दिल्लीतील विशेष न्यायालयात धाव घेत त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे. तेजस्वी यांनी जामिनाच्या अटी-शर्तींचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा, असे सीबीआयने अर्जात म्हटले आहे. या प्रकरणात तेजस्वी २०१८ पासून जामिनावर आहेत. जामीन रद्द झाल्यास त्यांची खुर्ची धोक्यात येऊ शकते.