पाटणा - बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी गुरुवारी (22 फेब्रुवारी) बिहार सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ''संविधान बचाओ न्याय यात्रे''मुळे घाबरल्यानं आता सरकार माझ्या हत्येचा कट रचत आहे, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला आहे. तेजस्वी यादव यांनी ट्विटरच्या माध्यमातून नितीश कुमार सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. त्यांच्या फोन टॅपिंगनंतर आता सर्किट हाऊस जेथे ते रात्रीच्या वास्तव्यास आहेत तसंच सभास्थळांच्या ठिकाणी त्यांची हेरगिरी केली जात असल्याचाही आरोप तेजस्वी यांनी केला आहे. दरम्यान, संविधान बचाओ न्याय यात्रेदरम्यान खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये विषारी पदार्थ मिसळण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप तेजस्वी यांनी बिहार सरकारवर केला आहे.
आपल्याविरोधात रचण्यात येत असलेल्या कटाविरोधातील माहिती विश्वस्त सूत्रांकडून मिळाल्याचं त्यांनी सांगितले. संविधान बचाओ न्याय यात्रेला जनतेचा प्रचंड प्रमाणात समर्थन मिळत आहे, यामुळे बिहार सरकार त्यांच्याविरोधात कट रचत असल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केला आहे. या यात्रेदरम्यान होणा-या सभांमुळे बिहार सरकार बिथरलं आहे,घाबरलं आहे, असेदेखील तेजस्वी म्हणालेत. मी नितीश कुमार यांचे काय वाकडे केले आहे?, ते माझ्यामागे का लागले आहेत?, हेच समजत नाही, असेही तेजस्वी म्हणालेत.
लालूंच्या मुलाने भूताला घाबरुन सोडला बंगला
दरम्यान, तेज प्रताप यादव यांनीही नितीश कुमार यांच्यावर आरोप केले होते. ''मला घराबाहेर काढण्यासाठी नितीश कुमारांनी माझ्या बंगल्यात भूतं पाठवली होती, असा खळबळजनक आरोप तेज प्रताप यादव यांनी केला. तेज प्रताप यादव राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा आहे. सत्ता गेल्यानंतर सहा महिन्यांनी तेज प्रताप यादव यांनी त्यांचे अधिकृत सरकारी निवासस्थान सोडले आहे. मला त्रास देण्यासाठी नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी माझ्या बंगल्यात भूतं सोडली होती, असे तेज प्रतापने रविवारी (18 फेब्रुवारी) पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये तेज प्रताप आरोग्य मंत्री होते. त्यावेळीत्यांना देशरत्न मार्गावरील 3 नंबर बंगला देण्यात आला होता. 2015 सालची बिहारची विधानसभा निवडणूक जदयू, राजद आणि काँग्रेस यांनी महाआघाडी करुन लढवली होती. त्यावेळी 243 सदस्यांच्या विधानसभेत या महाआघाडीला 178 जागा मिळाल्या होत्या. पण 20 महिन्यातच या महाआघाडीत फूट पडली आणि सरकार कोसळले. त्यानंतर नितीश यांनी जुलै महिन्यात भाजपाबरोबर आघाडी करुन सरकार स्थापन केले.
ऑगस्ट महिन्यात बिहार सरकारने राजद आणि काँग्रेसच्या मंत्र्यांना बंगले रिकामी करण्याचे आदेश दिले होते. तेज प्रताप यादव अति धार्मिक, दैववादी आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात यादव कुटुंबाविरोधात केंद्रीय पथकाकडून चौकशी सुरु असताना तेज प्रताप यांनी बंगल्यामध्ये दुश्मन मारन जपही केला होता असे सूत्रांनी सांगितले. दुसरी नोटीस मिळाल्यानंतर तेज प्रताप यादव यांनी बंगला रिकामी करण्याचा निर्णय घेतला असे आरजेडीचे प्रवक्ते शक्ती सिंह यादव यांनी सांगितले. ऑक्टोंबर महिन्यात तेज प्रताप यादव यांना दुसरी नोटीस मिळाली. त्यामध्ये बंगल्याच्या मूळ भाड्याच्या 15 पट जास्त दंड आकारण्याचा इशारा देण्यात आला होता, अशी माहिती आरजेडीमधील सूत्रांनी दिली.