चारा घोटाळ्यात डोरंडा कोषागार प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव (Tejashwi yadav) यादव यांची प्रतिक्रिया आली आहे. यादव यांनी तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की सारे सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही नाव घेत उदाहरण दिले.
पत्रकारांशी बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की, महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे उदाहरण घ्या. जेव्हा तुम्ही भाजपासोबत जाता तेव्हा तुमच्यावरील सर्व आरोप, गुन्हे मागे घेतले जातात. सर्व काही संपवून टाकले जाते. परंतू जेव्हा तुम्ही भाजपाची साथ सोडता तेव्हा त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयचे छापे सुरु होतात. आता अजित पवारांना त्रास दिला जात आहे. केंद्रातील भाजपा सरकारसोबत राहिले असते तर सारे ठीक राहिले असते. माझे वडील केंद्राच्या नीतींवर बोलतात त्यामुळे त्यांना याची शिक्षा दिली जाते, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला.
२०१९ मध्ये अजित पवारांनी पहाटे पहाटे भाजपाला समर्थन दिले होते. तेव्हा त्यांनी पवारांची एनसीपी तोडली होती आणि भाजपासोबत सरकारन बनविले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीही झाले, परंतू त्यांचा कार्यकाळ चार दिवसांचाही नव्हता. फडणवीसांनी राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवायला लावून शपथ घेतली होती, असे ते म्हणाले.
अजित पवारांनी शपथ घेताच त्यांच्याविरोधातील जलसिंचन घोटाळ्याची ९ प्रकरणे मिटविण्यात आली होती. यावरून भाजपा विरोधी पक्षातील नेत्यांशी कशी वागते, हे दिसत असल्याचा आरोप तेजस्वी यांनी केला आहे.