बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला आता वर्षभराचा अवधी उरला आहे. त्यामुळे आता राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीच्या वातावरणनिर्मितीला सुरुवात झाली आहेत. बिहारमध्ये सध्या उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावरून राजकारण तापलं आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी त्यांना मिळालेला शासकीय बंगला रिकामी करताना तेथील सामानसुद्धा आपल्यासोबत नेले, असा आरोप भाजपाने केला आहे. भाजपाचे मीडिया प्रभारी दानिश इक्बाल यांनी तेजस्वी यादव यांच्यावर आरोप करताना सांगितले की, आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी जेव्हा ५, देशरत्न मार्ग येथील शासकीय निवासस्थान रिकामी केलं. तेव्हा सोबत सरकारी निवासस्थानामधील बेड, एसी आणि बेसिनही नेले.
तेजस्वी यादव यांनी शासकीय निवासस्थानामधील जिमचं सामानही गायब केलं, असा आरोप भाजपाने केला आहे. एवढंच नाही तर बॅडमिंटन कोर्टाचा फ्लोअर काढून नेण्यात आला आहे. तसेच वॉशरूममधील नळाच्या तोट्याही गायब झाल्या आहेत, असा आरोपही भाजपाने केला आहे.
आम्ही लवकरच बांधकाम विभागाकडून दिल्या गेलेल्या सामानाची यादी प्रसिद्ध करणार आहोत, असे भाजपाकडून याबाबत अधिक माहिती देताना सांगण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी तेजस्वी यादव यांनी हे शासकीय निवासस्थान रिकामी केलं होतं. त्यानंतर आता हे निवासस्थान विद्यमान उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना देण्यात आलं आहे.