घरी CBI ची धाड पडताच तेजस्वी यादवांना आठवले अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 09:08 AM2023-03-08T09:08:00+5:302023-03-08T09:11:49+5:30
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यादव यांना अजित पवारांची आठवण झालीय.
मुंबई/पाटना - राष्ट्रवादीचे नेते आणि आत्ताचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक चर्चेचा मुद्दा ठरला आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या होत्या, त्यामुळे देशातही या शपथविधीची चांगलीच चर्चा रंगली होती. पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवार यांना सातत्याने प्रश्नांना सामोरे जावे लागते. याचदरम्यान, आता बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या घरावर सीबीआयने धाड टाकली आहे. याप्रकरणी सध्या यादव कुटुंबीयांची चौकशी सुरू असतानाच बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यादव यांना अजित पवारांची आठवण झालीय.
बिहारच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी पत्रकारांशी बोलताना सध्या भाजपकडून आणि केंद्रातील मोदी सरकारकडून कशारितीने विरोधकांना टार्गेट केलं जातंय, हे सांगण्यात आलं. यावेळी, उदाहरण देताना त्यांनी चक्क राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा नामोल्लेख केला. जर तुम्ही भाजपसोबत राहिलात तर राजा हरिश्चंद्र म्हणतील, तुम्हा महाराष्ट्रात पाहिलंच असेल. शरद पवार यांचे पुतणे जे भाजपात गेले होते, तेव्हा ईडीने सगळ्या केस वापस घेतल्या होत्या. पूर्व भारतात टीएमसीचे जे नेते होते, मुकूल तेही भाजपात गेले की त्यांना ईडीने बोलावणेच बंद केले. त्यामुळेच, तुम्ही भाजपविरुद्ध लढत असाल, भाजपला आरसा दाखवत असाल तर तुमच्याविरुद्ध असं काम होईलच, त्यात काहीच नवं नाही, असेही तेजस्वी यादव यांनी म्हटले.
लालूप्रसाद यांची अडीच तास चौकशी
केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयनं बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची मंगळवारी जवळपास अडीच तास चौकशी केली. ही चौकशी IRCTC घोटाळा म्हणजेच लँड फॉर जॉब स्कॅम संदर्भात करण्यात आली. सीबीआयचं पथक लालूंच्या चौकशीसाठी मिसा भारती यांच्या दिल्लीस्थित निवासस्थानी पोहोचलं होतं. लालू सध्या याच ठिकाणी वास्तव्याला आहेत. याआधी सीबीआयनं सोमवारी पाटणामध्ये राबडी देवी यांची चार तास चौकशी केली.
मुख्यमंत्री शिंदेंनी काढला चिमटा
सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी राज्यपालांच्या अभिभाषणावर आपली भूमिका मांडली. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा शिंदे यांनी काढला. देवेंद्र फडणवीस यांनी मला पहाटेच्या शपथविधीबाबत दोन-तीन किस्से सांगितले आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे, राहून राहून अजित पवारांचा तो शपथविधी चर्चेत येताना दिसतो.