बिहारची राजधानी पाटणा येथील ऐतिहासिक गांधी मैदानावर महाआघाडीच्या जनविश्वास महारॅलीमध्ये बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल करताना तेजस्वी यादव यांनी अभिनेता हृतिक रोशनच्या चित्रपटातील "इधर चला मैं उधर चला जाने कहां मैं किधर चला अरे फिसल गया ये तूने क्या किया…" हे गाणं गात खोचक टोला लगावला आहे.
जनविश्वास रॅलीला संबोधित करताना तेजस्वी यादव म्हणाले की, मी जितकं लांब पाहतोय तितके लांब मला लोक दिसत आहेत. आम्ही 10 दिवस बिहारचा दौरा केला. आपण सर्वांनी यावे ही विनंती केली होती. आज रॅलीतील गर्दीने विक्रम मोडला आहे. तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका करताना म्हणाले की, जेव्हा ते 10 लाख नोकऱ्यांबद्दल बोलत होते, तेव्हा त्यांनी पैसे कुठून येणार असा सवाल केला होता.
तुम्ही आम्हाला साथ द्या, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं तेजस्वी यांनी लोकांना सांगितलं. ते पुढे म्हणाले की, "राजद हा केवळ माझा पक्ष नाही. काही आमदार इकडून तिकडे फिरतात. पण जनतेला कसं आणि कुठून विकत घेणार? ही विचारसरणीची लढाई आहे. आम्ही सर्वजण कोणालाच घाबरणार नाही."
"तुम्ही लोकांनी भाजपाला 40 पैकी 39 जागांवर विजयी केलं, त्यांनी नोकऱ्या दिल्या की गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवलं? पंतप्रधान माझ्या वडिलांबद्दल बोलत होते पण माझ्या वडिलांनी रेल्वेत ऐतिहासिक काम केलं. माझ्या वडिलांनी पहिल्यांदा रेल्वेला फायदेशीर बनवलं" असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे. तसेच जनविश्वास रॅलीदरम्यान मुख्य मंचावर उपस्थित सर्व नेत्यांनी एकमेकांचे हात धरून उभे राहून संपूर्ण देशाला विरोधी पक्षांच्या एकतेचा आणि ताकदीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.