नवी दिल्ली - सध्या सोशल मीडियावर तेजस्वी यादव यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 'हम तेजस्वी यादव बोल रहे हैं, DM साहब' असं म्हणत तेजस्वी यादव यांनी केलेल्या फोन कॉलची बिहारमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. पाटणा येथे शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना पाठिंबा देण्यासाठी तेजस्वी यादव पाटणा येथे आले होते. यावेळी आंदोलकांनी आपल्याला ठरलेल्या ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी दिली जात नसल्याचं सांगितलं. याच दरम्यान तेजस्वी यादव यांनी थेट अधिकाऱ्यांना फोन केला आहे.
तेजस्वी यादव यांनी मुख्य सचिव, पोलीस आयुक्त आणि पाटण्याचे जिल्हा दंडाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि आंदोलनाची परवानगी मिळेल असं आश्वासन दिलं आहे. तेजस्वी यांनी आंदोलक शिक्षकांच्या उपस्थितीत पाटण्याचे जिल्हा दंडाधिकारी चंद्रशेखर सिंग यांना घटनास्थळावरुन फोन केला. आंदोलन करण्यासाठी शिक्षकांना परवानगी का दिली जात नाही याबाबत विचारणा केली. तसेच त्यांनी रोज रोज परवानगी मागणं अपेक्षित आहे का? असा सवाल देखील तेजस्वी यादव यांनी विचारला.
"शिक्षकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यांचं अन्न फेकून देण्यात आलं, हे सर्व घाबरले आहेत…आता मी त्यांच्यासोबत पार्कमध्ये आहे. मी तुम्हाला यांचा अर्ज व्हॉट्सअॅप करतो. तुम्ही कृपया यांना परवानगी द्या" असं तेजस्वी यादव यांनी फोन कॉलमध्ये म्हटलं आहे. कधीपर्यंत काम करणार असं विचारलं असता अधिकाऱ्यांनी आता तुम्ही मला प्रश्न विचारणार का? असं म्हटलं. यावर तेजस्वी यांनी 'हम तेजस्वी यादव बोल रहे हैं, DM साहब' असं म्हणत आपली ओळख सांगितली.
फोनवर तेजस्वी यादव बोलतात हे समजल्यावर अधिकाऱ्यांना धक्का बसला. आवाजात थोडा बदल पाहायला मिळाला. अधिकाऱ्यांनी ओके सर म्हणत काम करण्याचं आश्वासन दिल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तेजस्वी यादव यांचा हा फोन कॉल सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. तेजस्वी यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शिक्षकांच्या आंदोलनाबाबत ट्विट केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.